मोढवे गावच्या परिसरातील खडी क्रशर बंद करण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा


मोढवे गावच्या परिसरातील खडी क्रशर बंद करण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मोढवे (मोटेवाडी) गावच्या परिसरामध्ये असणाऱ्या खडी मशीनचा त्रास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून होत असून या खडीमशीन बंद करण्यात याव्यात अन्यथा उपोषणाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे नुकताच तहसीलदार यांना दिला आहे. 

   या भागात असणाऱ्या खडीमशिन, डांबर प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे चालू आहेत. त्यामुळे मोटेवाडी, मोढवे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील जमिनी खडी मशीनच्या होणाऱ्या धुळीमुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील आजूबाजूच्या पिकांवर धुळीचा खूप मोठा परिणाम होत आहे. येथे होणाऱ्या स्फोटामुळे काही घरांना, मंदिरांना, विहिरींना तडे गेले आहेत. शेतामध्ये काम करीत असताना धुळीमुळे महिला व शेतकऱ्यांना काम करणेही अवघड झाले आहे व येथे सतत स्फोट घडवल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. खडी वाहतूक करणार्या मोठ्या गाड्यांमुळे राख ते (मोटेवाडी) मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेणे, शेतमाल वाहतूक करणे अवघड बनले आहे. 

      ध्वनीप्रदूषण, वायू प्रदूषण या त्रासामुळे आम्ही कसे जगायचे, आमच्या शेतीचा, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला या त्रासामुळे जमिनी, गाव सोडण्याची वेळ आली आहे असे मत मोटेवाडी येथील शेतकरी दशरथ कोळपे व दादा कोळपे या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. अनेकदा तक्रार करूनही गावपुढारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत असेही येथील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

    येत्या १५ दिवसात या खडी मशीनवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा येथील ग्रामस्थांसहित आम्ही बारामती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, तानाजी कोळेकर, सुहास टकले, दशरथ कोळपे, दादा साधू कोळपे यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News