पालकमंत्र्यांचे आदेश; भाजप सत्ताकाळातील प्रकरण


पालकमंत्र्यांचे आदेश; भाजप सत्ताकाळातील प्रकरण

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

नागपूर : भाजपची सत्ता असतानाच्या काळात करण्यात आलेले  शिवणगाव गावठाण पुनर्वसन भूखंड  वाटपाची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याबाबत प्रकल्पग्रस्तांच्यावतीने  काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी तक्रार केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालात पालकमंत्र्यांनी यासंदर्भात सोमवारी बैठक घेतली. बैठकीला  प्रकल्पग्रस्तांसोबतच आमदार नागो गाणार, आमदार राजू पारवे, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते.

शिवणगाव गावठाणाची मोजणी १३ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०११ या काळात झाली होती. मोजणी व भूखंड वाटपासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. भाजपची सत्ता असतानाच्या काळात भूखंड वाटप करताना संयुक्त कुटुंबांना विभक्त तर विभक्त कुटुंबांना संयुक्त कटुंब दर्शवून भूखंड देण्यात आले. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया राबवताना भाजप समर्थकांना अधिक लाभ व्हावा यादृष्टीने यंत्रणा राबवली गेल्याचा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला. चुकीच्या वाटपाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या पण त्याची यापूर्वीच्या सरकारने घेतली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपचे आमदार नागो गाणार यांनीही भूखंड वाटपात भेदभाव झाला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी ही बाब गंभीरतेने घेत शिवणगाव पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात भूखंड वाटपाची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच  शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकरी कुटुंबांना तीन हजार चौरस फूट व बिगरशेतकरी कुटुंबास दीड हजार चौरस फूट, कुटुंबातील विवाहित सदस्यास वाढीव ५०० चौरस फूट भूखंड देण्याचे निर्देशित केले.

शिवणगाव पुनर्वसन भूखंड वाटपात अनेक अनियमितता आहेत. भाजप सत्ताकाळात भूखंड वाटप करताना राजकीय हस्तक्षेप झाला होता. याबाबत तक्रारी केल्यावरही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने भूखंड न मिळालेल्या सुमारे २०० प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News