यवत ते हडपसर पीएमपीएमएल बससेवा सुरू


यवत ते हडपसर पीएमपीएमएल बससेवा सुरू

मिलिंद शेंडगे

यवत : कोरोनाच्या संकट काळात पुण्यातील पालिकेची पीएमपीएमएल ही बससेवा बंद ठेवण्यात आल्याने पुणे महानगरपालिकेचे अतोनात नुकसान झाले आहे. अनलॉक नंतर अजूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने शहरी भागात प्रवाशांअभावी बससेवा तोट्यात चालली आहे. त्यामुळे बससेवेचे नियोजन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पालिकेने पीएमपीएमएलला आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या शहराच्या हद्दी बाहेरील काही मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून पीएमपीएमएलने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे (दि.१२) औचित्य साधून यवत ते हडपसर अशी बससेवा सुरू केली आहे.

      सदर बससेवा सुरू झाल्याने यवतवरून पुण्यामध्ये कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नोकरदार तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली असून त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. सदर बससेवेचा लाभ या मार्गावरील १२ गावांना होणार आहे. यवत ते हडपसर असा एकूण ४० किमीचा टप्पा असून या मार्गावर बसच्या दिवसभरात २४ फेऱ्या होणार आहेत.

      दरम्यान, यवत ते हडपसर बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी यवत येथील स्थानिक पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी व नोकरदार वर्गाने देखील वारंवार मागणी केली होती. त्या मागणीला आता यश आले आहे.

       तत्पूर्वी, सदर मार्गावरील पहिल्या बसचे यवत येथे फुलांनी, हारांनी सजवून व पूजा करून उद्घाटन करण्यात आले. तसेच बसचे चालक व वाहक यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रवाशांनी व नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उरूळीकांचन पर्यंत मर्यादित असणारी बससेवा यवतपर्यंत सुरू केल्याने पुणे पालिका प्रशासनाचे आभार मानले व पीएमपीएमएलला शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News