मुंडे साहेब गोरगरीबांचे मसिहा होते. शेतकरी कष्टकरी शेतमजुरांच्या कष्टाची त्यांना जाण होती. स्व.मुंडे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देत असत. असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी आज शेवगाव येथे केले. दि १२ रोजी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अॅड. काकडे बोलत होते. यावेळी जि. प. सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, जनशक्तीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा गावडे, जनशक्तीचे शहर प्रमुख सुनील काकडे, माजी नगराध्यक्ष विनोद मोहिते, अब्जाद पठाण, प्रमोद गर्जे, रविंद्र घुगरे, निलेश आठरे, अरुण काळे, बंडू देहाडराय, सुनील आव्हाड, अजय नजन, मेजर प्रेमचंद भांबरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे अॅड काकडे म्हणाले की, मुंडे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील नेत्याला जनमानसात एक आदराचे स्थान मिळवून दिले. मुंडे साहेब शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गोरगरीबांचे वाली होते. स्वर्गीय मुंडे यांना ऊस तोडणी कामगारांचे नेते म्हणूनही संबोधले जायचे. आज जर मुंडे साहेब हयात असते तर शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे चित्र वेगळे असते. असेही काकडे बोलताना म्हणाले. अशा या संघर्षयोद्धाला यावेळी जनशक्ती विकास आघाडी व आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाकडून जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.