सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत कलम १४४ लागू


सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत कलम १४४ लागू

मिलिंद शेंडगे

पुरंदर : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची यंदाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच श्रींचा पालखी सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे. दि. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश बंदी असून कलम १४४ नुसार तसा जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

       शासनाने मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू केली आहेत. परंतु त्यासाठी काही नियम, अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पुन्हा नव्याने त्याचे संकट निर्माण होऊ नये व जेजुरीत यात्रेच्या वेळी नाहक गर्दी होऊन भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. सदर जमावबंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून शनिवार दि.१२ ते सोमवार दि.१४ डिसेंबर दरम्यान भाविकांनी जेजुरीत येऊ नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केले आहे.

      सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथील पेशवे लॉज येथे ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी, देवस्थान विश्वस्थ मंडळ व नगरपालिका प्रशासन यांच्यात संयुक्तिक बैठक घेण्यात आली. बैठकीत सोमवारी येणाऱ्या सोमवती अमावस्या यात्रा व मंगळवार पासून सुरू होणाऱ्या सहा दिवसांच्या चंपाषष्ठी उत्सवाबाबत चर्चा करण्यात आली. 

     एकूणच, राज्याच्या विविध भागातून दरवर्षी सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत येणाऱ्या भाविकांना यंदा मात्र आपल्या लाडक्या कुलदैवताचे खंडेरायाचे दर्शन घरातूनच घ्यावे लागणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News