64 व्या महापरिनिर्वाण दिनी 64 नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प फिनिक्स फाऊंडेशनचा पुढाकार


64 व्या महापरिनिर्वाण दिनी 64 नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प  फिनिक्स फाऊंडेशनचा पुढाकार

डॉ. बाबासाहेबांचे विचार समोर ठेऊन अवयवदान चळवळीत योगदान देण्याची गरज -जालिंदर बोरुडे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने 64 नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. फाऊंडेशनच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच देशात अनेक नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असताना त्यांना नवीन जीवदान देण्यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन करुन, अवयवदानाचे अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अतुल थोरात, प्रदिप भिंगारदिवे, सुनिल थोरात, राजू गायकवाड, अक्षय म्हस्के, अनिल जाधव, संजय भिंगारदिवे, अजय आठवले, अरविंद साळवे, सुनिल सकट आदि उपस्थित होते.

 जालिंदर बोरुडे म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी केल्यास खर्‍या अर्थाने त्यांना आदरांजली ठरणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण आयुष्य दीन-दलितांच्या उध्दारासाठी खर्च केले.  त्यांची शिकवण आजही सर्व समाजबांधवांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचार समोर ठेऊन अवयवदान चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. देशात मोठ्या संख्येने नागरिक अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. शरीर हे नष्वर असून मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवाने इतरांना जीवदान मिळत असेल तर यासारखे पुण्य कमविण्याचे भाग्य दुसरे नाही. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून 7 व्यक्तींना जीवदान मिळू शकतो. अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, विविध माध्यमांद्वारे समाजात जागृती करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News