बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोनामुळे रद्द


बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोनामुळे रद्द

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

     श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या वतीने सर्व भाविकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, दि. १५ व १६ डिसेंबर २०२० रोजी होणारी यावर्षीची श्री नायकोबा देवस्थान यात्रा व पालखी सोहळा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमुळे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नायकोबा मंदिर परिसरात भाविकांनी यात्रेच्या दरम्यान गर्दी करू नये असे आवाहन नायकोबा देवस्थान यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

   श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून राज्याच्या विविध भागातून भाविक याठिकाणी येत असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. यात्रेत बकरी कातरण्याच्या कात्री, लोकरीपासून बनविलेली ऊबदार घोंगडी, जान, ब्लॅंकेट तसेच धनगर समाजासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य अशा माध्यमातून याठिकाणी ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी विक्रीची उलाढाल होत असते.

   श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक पार पडली त्यात यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य, संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News