लहानग्यांच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना घरगुती मिटरला आग; जीवितहानी टळली


लहानग्यांच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना  घरगुती मिटरला आग; जीवितहानी टळली

मिलिंद शेंडगे

ऊरुळीकांचन : हवेली तालुक्यातील मौजे उरुळीकांचन येथे अचानक घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत घरगुती लाईट मीटर जळून खाक झाले असून तेथे खेळणाऱ्या चिमुकल्या मुलांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी हानी टळली. यावेळी सदर मुलांनी मोठ्यांना सावध करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले व पुढील दुर्घटना टाळली.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मौजे उरुळीकांचन येथे बुधवार दि. २ रोजी सकाळी १० च्या सुमारास महेश जगताप यांच्या घराबाहेर बसविलेल्या लाईट मिटरला अचानक धूर येऊन छोटीशी आग लागली व बघता-बघता आगीने मोठे रूप धारण केले. अचानक घडलेला सदरचा प्रकार तेथेच खेळत असलेल्या इशिता स्वप्नील दिवटे (वय-११) हिच्या प्रथम लक्षात आला. तिने हा प्रकार सोबत खेळत असलेल्या कृष्णा महेश जगताप (वय-८) याला सांगितला. तोपर्यंत मीटरने पेट घेतला होता. अशावेळी या दोन चिमुकल्यांनी घाबरून न जाता मोठ्या धीराने घरातील महिलांना बोलावून आणले. यावेळी महिलांनी आरडाओरडा करत सर्वांना सावध केले.

       आगीची घटना समजताच जवळच असलेल्या संत मदर तेरेसा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सी. आर. कांबळे, अजिंक्य शिर्के, प्रदिप भोसले यांनी अन्य लहान मुलांच्या मदतीने आगीच्या ठिकाणी वाळू टाकत आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न केले व लगेचच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठी जीवितहानी व वित्तहानी टळली. जळत्या ठिकाणाहून जवळच १ ते २ फुटांवर असलेल्या महेश जगताप यांची कार स्वप्नील दिवटे यांनी तात्काळ बाहेर काढली.

      आगीची भयानकता व गंभीरता पाहून सी. आर. कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या संजय पोफळे यांना कळविले असता त्यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना सदर घटनास्थळी पाठवले व ते स्वतः जातीने हजर राहिले व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करत आग आटोक्यात आणण्यास सहकार्य केले. तोपर्यंत लहानग्या मुलांनी मोठ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले होते. 

       आगी सारख्या गंभीर व भयानक प्रसंगात जिथे मोठी माणसे देखील आपले धैर्य गमावतात तिथे इशिता व कृष्णाने अजिबात घाबरून न जाता पुढील धोका ओळखून प्रसंगावधान दाखवत मोठ्या धीराने आग आटोक्यात आणण्यास मदत केली व होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यास मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसाचे परिसरात कौतुक तर होतच आहे परंतु शासन दरबारी देखील त्यांच्या स्तरावर सदर बालकांचा यथोचित सत्कार व सन्मान केला गेला पाहिजे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News