मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान

नातेवाईकांनी घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भूमी गुंठा आवास योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून इसळक-निंबळक येथे घरासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, गरजू घटकातील घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी संघटनेच्या वतीने रविवार दि.6 डिसेंबर रोजी भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

राज्य व केंद्र सरकार घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यास दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेने स्वत: शहरालगत जागा शोधून लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर भूमी गुंठा आवास योजना सुरु केली. इसळक-निंबळक येथे 230 घरांचा प्रकल्प उभा राहत असताना, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात एक गुंठा जमीन मिळणार आहे. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय सरकारी योजनेतून घरासाठी त्यांना 50 हजार रुपये देखील अनुदान मिळणार असल्याने घरकुल वंचितांना ही जागा अवघ्या 30 हजार रुपयातच उपलब्ध होणार आहे. मात्र गरजू घटकातील घरकुल वंचितांकडे जागेसाठी पैसे उपलब्ध नसल्याने त्यांचे घरांचे स्वप्न साकार होण्यासाठी नातेवाईकांनी आर्थिक मदत देण्याच्या भावनेने भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये आपल्या घरकुल वंचित नातेवाईकाला घरासाठी मदत करणार्‍यांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. बाळासाहेब सुंबे यांनी आपल्या गरीब बहिणीला घराच्या जागेसाठी आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचा रविवारी सन्मान केला जाणार आहे. तसेच घरे नसलेल्या आपल्या नातेवाईकांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सरकारवर विसंबून न राहता घरे होण्यासाठी नातेवाईकांनीच मदत करण्याची अपेक्षा आहे. आपल्या गरजू नातेवाईकास घर होण्यासाठी मदत केल्यास घरांचे स्वप्न साकार होणार आहे. राजधर्मापेक्षा नातेधर्म मोठा असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.  भूमीगुंठा नातेधर्म कृतीवीर सन्मान कार्यक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले, संतोष अडागळे प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News