कर्जत प्रतिनिधी - कर्जत नगरपंचायत च्या वतीने नागरी सुविधा सहाय्यनिधी योजनेअंतर्गत कर्जत शहरात एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या गार्डनचा लोकार्पण सोहळा नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे पाटील व माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते दिनांक २३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला होता. हा कार्यक्रम शासकीय असताना सुद्धा स्थानिक कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचे नाव गार्डन मधे बसवलेल्या कोणशिलेवर आणि कार्यक्रम पत्रिकेत का छापले नाही या बाबत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत व मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील शेलार यांनी नगरपंचायतच्या बाबतीत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आमदार रोहित पवार यांचे नाव पत्रिकेत छापण्यास नामदेव राऊत यांना ॲलर्जी आहे काय? असा प्रश्न उपस्थित करून शेलार म्हणाले की आगामी नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण कामांचे उद्घाटन राऊत हे करत असून या उद्घाटन केलेल्या गार्डनचे काम अजून पूर्ण झालेले नसून त्याचे उद्घाटन का करण्यात आले. कारण विद्यमान नगरसेवकांची व नगराध्यक्षांची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे असे उद्घाटनाचे कार्यक्रम करत आहेत. तसेच कर्जतला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर पाण्याचे उद्घाटन नामदेव राऊत यांच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच केले होते. तेंव्हा पण ते काम पूर्ण झाले नव्हते आणि आजही या सार्वजनिक फिल्टर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी जनतेला होत नाही. असा आरोप शेलार यांनी केला कारण नामदेव राऊत यांचे कार्यकर्ते टॅंकरवर नामदेव राऊत यांचा फोटो छापून भाजपचे पदाधिकारी आपापल्या प्रभागात पिण्याच्या पाण्याचे वाटप टँकरद्वारे करताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे कर्जत नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी टेंडर का काढले याचा खुलासा राऊत यांनी करावा अशी मागणी शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच विद्यमान नगरसेवकांपैकी किती नगरसेवक नळाचे पाणी पितात याचाही खुलासा नामदेव राऊत यांनी जनतेसमोर करावा असे आव्हान शेलार यांनी दिले. तसेच कालच्या गार्डन च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणात नामदेव राऊत म्हणाले होते की राम शिंदे मंत्री असताना कर्जत साठी ९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर राम शिंदे बोलताना म्हणाले की मी कर्जत साठी सव्वाशे कोटींच्यावर निधी दिला आहे तर मग या दोन्ही आकड्यां मधील तफावतीचा खुलासा राऊत यांनी करावा असे शेलार यांनी म्हटले. शेलार म्हणाले की राऊत यांची खोट बोलण्याची व रेटून नेहण्याची सवय चालली आहे ती इथून पुढे चालणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असे सूचक वक्तव्य शेलार यांनी केले. तसेच आतापर्यंत कर्जत नगरपंचायतला आलेल्या विकासकामांच्या निधीतून केलेली कामे स्वतः नामदेव राऊत यांनी वेगवेगळ्या एजन्सी च्या नावे टाकून स्वतःच सर्व कामे केलेली आहेत. त्यामुळे झालेल्या कामांची गुणवत्ता कशी आहे हे कर्जतच्या जनतेला चांगले माहीत आहे. काल भाषणात बोलताना नामदेव राऊत म्हणाले होते की कर्जतची स्मशानभूमी इतकी सुंदर बनवली आहे त्यामुळे तेथेही लोक फिरायला जातात यावर बोलताना सुनील शेलार म्हणाले की स्मशानभूमी म्हणजे काय पर्यटन स्थळ आहे का तेव्हा तिथे लोक फिरायला जातात याबाबतीत राऊत यांनी बोलताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवे होते जर लोक स्मशानभूमीत फिरायला जात असतील तर मग गार्डनला खर्च कशासाठी केला असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला शेवटी बोलताना शेलार म्हणाले की कर्जत नगरपंचायतची निवडणूक आमदार रोहित पवार हे पूर्ण ताकदीने व नियोजनबद्ध पद्धतीने लढवणार असून सर्वच्या सर्व १७ जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आणणार असल्यामुळेच नामदेव राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते अर्धवट कामांचे उद्घाटन करण्यात दंग झालेले दिसत आहेत. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, प्राध्यापक सतीश (काका) पाटील, सचिन सोनमाळी, माजी ग्रामपंचायत सदस्य नाथाशेठ गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी, जाकिर सय्यद, राहुल नेटके, सुशील मराळ आदी मान्यवर उपस्थित होते.