सचिन साठे यांच्या राजीनाम्याचे शहर कॉंग्रेसमध्ये पडसाद


सचिन साठे यांच्या राजीनाम्याचे शहर कॉंग्रेसमध्ये पडसाद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 12 नोव्हेंबर 2020) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला. त्यानंतर चोविस तासातच त्याचे पडसाद शहरात उमटले. गुरुवारी शहर कॉंग्रेसच्या पाच प्रमुख पदाधिका-यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा देणा-यांमध्ये पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव तसेच भोसरी ब्लॉकचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष थोरात यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात पक्षश्रेष्ठींनी आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराला न्याय दिलेला नाही व न्याय देण्याच्या भूमिकेत पक्षश्रेष्ठी दिसत नाहीत. हि बाब वेळोवेळी निदर्शनास आणून देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. अशी खंत या पदाधिका-यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

         सचिन साठे यांनी त्यांच्या शहराध्यक्षपदाच्या कार्यकालात शहरातील सर्व जाती धर्माच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मान सन्मान देऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे. साठे यांनी आतापर्यंत पक्ष संघटनेत केलेले काम पाहता त्यांना प्रदेश नेतृत्वाने विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. सचिन साठे हे महाविद्यालयीन काळापासून कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी राजीव गांधी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात अनेक कार्यक्रम घेऊन उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षश्रेष्ठींनी यावेळी तरी विधान परिषदेवर संधी द्यायला हवी होती. त्यामुळे शहर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असते. सचिन साठे यांना विधान परिषदेसाठी डावलल्यामुळे शहर कॉंग्रेसचे आणखी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामे देतील असे एका प्रमुख पदाधिका-याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News