अंकुशतुपे
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.५: आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांची भागीदारी असणार्या हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी एक कोटी ४१ लाख ८८ हजार तीनशे वीस रुपये किंमतीचे ट्रान्सफार्मर मधील कॉपर व ऑइल चोरून नेले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू होत असले तरी हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाईड प्रा. लि.साखर कारखाना अद्याप सुरू झाला नसताना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल पाच ट्रान्सफार्मर मधील ४८ हजार ८८० किलोग्रॅम कॉपर (प्रतिकिलो अंदाजे २६४ रुपये प्रमाणे) व त्याच पाच पैकी १३२ के व्ही च्या एका ट्रान्सफर्मर मधील २५ हजार ६८० लिटर ऑइल (प्रति लिटर अंदाजे ५० रुपये) असा एकूण एक कोटी ४१ लाख ८८ हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत असिस्टंट लीगल ऑफिसर सुनील गोरख दरेकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याआधीही जून २०२० ते २८ ऑक्टोबर २०२० दरम्यान याच कारखान्यातील मिल सेक्शन, पॉवर हाऊस सेक्शन व स्विच यार्ड विभागात या चोरी झाली होती.
श्रीगोंदा पोलिसात गुरुवार दि.५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.