श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.३: श्रीगोंदा तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागण्यांचे निराकरण व्हावे म्हणून जेष्ठ शेतकरी नेते राजेंद्र मस्के सोमवार दि.२ रोजी श्रीगोंदा तहसील समोर उपोषणाला बसले होते. सोमवारी त्यांना प्रशासनातर्फे उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु लेखी आश्वासन न मिळाल्याने त्यांनी उपोषण सुरू ठेवले. माजी आमदार राहुल जगताप यांच्या मध्यस्तीने व सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून लेखी आश्वासन दिल्याने मस्के यांचे दीड दिवसांचे उपोषण दुसऱ्या दिवशी एक वाजता मागे घेतले.
> राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख मागण्या यावेळी मान्य करून कार्यवाहीचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची हेक्टरी ५०,००० रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने त्वरित खड्डे बुजवून दुरुस्ती करणे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कपाशीला कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे बाजारभाव द्यावा. जे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व कापूस,बाजरी,मका या पिकांचे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत. नागरिकांना व्यक्तीगत कामासाठी लागणारे फेरफार व रेकॉर्ड वेळेत मिळावे. लिंबू पिकाचा फळबागेत समावेश करावा. या प्रमुख मागण्या होत्या.
तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के २ नोव्हेंबरला तहसीलसमोर अमरण उपोषणास बसले होते. ३ नोव्हेंबरला तहसीलदार प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के,गटविकास अधिकारी प्रशांत काळे,पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या लेखी अश्वासनानंतर दुपारी एक वाजता राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण सोडले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, अनिल ठवाळ,संतोष लगड,संतोष इथापे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.