निमगाव वाघात होईक ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी


निमगाव वाघात होईक ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी

मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकित खरे ठरले.. कोरोना अजून सात ते आठ महिने राहण्यार असल्याचे भाकीत..दुसर्‍यावर्षी देखील पशु हत्या बंदीचे पालन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम रविवारी (दि.1 नोव्हेंबर) पार पडला. मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकीत खरे ठरले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर कोरोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार असून, देशात मोठ्या चळवळीचे भाकीत त्यांनी सांगितले. तर युध्दाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याचे सांगितल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.या वर्षी देखील पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना म्हणाले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पूर वाहणार म्हणजे युध्द होणार. बाया न्हात्यान, धुत्यान वपालखीत मिरत्याल. लक्ष्मीला पिडा नसून, बाळाला संकट आहे. चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल. दिवाळीच दिपान पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. सटीच सटवान पाच ते सात दिवस फिरुन कर्मभागी पाऊस होणार आहे. गायी देठाला लागून, नव तूप होणार. दिनमान (ग्रहण) काळा होईल. कपाशीला 7 ते 9 हजार क्विंटल, सोन्याला 40 ते 54 हजार रु. (तोळा), ज्वारी 2500 ते 2700 रु., पर्यंतचा पुढील वर्षासाठी भाव वर्तवला. तसेच गहू, हरभर्‍यावर तांबारा रोग पडेल व गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर  कल्याण कुर्तिका सात ते अकरा दिवस आभाळ फिरुन पाऊस होईल. पुढील आषाढी कठिण जाईल व मुगराळ्याची पेर होऊन घडमोड होईल. ज्वारी, गहू व हरभार्‍याची पेर होऊन काही हसतेन काही रडतेन, असे भाकीत होईकात सांगण्यात आले आहे.   भुसारे यांनी मागील वर्षी युध्द, नैसर्गिक संकट व रोगराईचे सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरले. यावर्षी पाकिस्तान, चीनशी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी महापूर, चक्रीवादळ आले. तर कोरोना सारख्या महामारीशी सामना करावा लागत आहे. भविष्यवाणी ऐकण्यासाठी नगर शहर, निमगांव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखनगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पै.नाना डोंगरे, बाबा जाधव, गोकुळ जाधव, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, संजय डोंगरे, रावसाहेब भुसारे, बशीर शेख, रामदास वाखारे, बाळासाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, शिवाजी पुंड, अरुण फलके, बाबा चारुडे, साहेबराव बोडखे, गुलाब जाधव, भागचंद जाधव, अरुण कापसे, विजय जाधव, सचिन उधार, भाऊसाहेब ठाणगे, राजेंद्र भुसारे, ठकाराम शिंदे, युवराज भुसारे, नवनाथ जाधव, अंबादास निकम, सुरेश जाधव यांनी परिश्रम घेतले. भाविकांसाठी गावात भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News