कोजागरी पौर्णिमा सणवार विशेष लेख


कोजागरी पौर्णिमा सणवार विशेष लेख

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

       शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर कोजागरी पौर्णिमा चालू होते. या वर्षी अधिक आश्‍विन मास असल्याने निज आश्‍विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा आहे.   

१. *आश्‍विन पौर्णिमेच्या विविध नावांचा अर्थ :* आश्‍विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा नवान्न पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

अ. आश्‍विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी को जागर्ति म्हणजे कोण जागत आहे ? असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात.

आ. आश्‍विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे म्हणतात.

इ. आश्‍विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे म्हणतात.

२. *पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यास कोणत्या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी ? :* ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगानुसार आश्‍विन मासात मध्यरात्रीला असणार्‍या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ पासून ३१.१०.२०२० या रात्री ८.१९ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. ३०.१०.२०२० या दिवशी मध्यरात्रीला पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. 

३. *कोजागरी पौर्णिमेला चंद्र पहाण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व :* या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करतात. यामुळे लक्ष्मीकृपेने सुखसमृद्धी प्राप्त होते. रात्री दुधात चंद्राचे दर्शन घेतल्याने चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृतप्राप्ती होते. याचे कारण आश्‍विन पौर्णिमा अश्‍विनी नक्षत्रात चंद्र असतांना होते. अश्‍विनी नक्षत्राची देवता अश्‍विनीकुमार आहे. अश्‍विनीकुमार सर्व देवतांचे चिकित्सक (वैद्य) आहेत. अश्‍विनीकुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेत आश्‍विन पौर्णिमेला चंद्रदर्शनाने त्रास होत नाही.  ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला मनाचा कारक मानले आहे. त्यामुळे आपल्या मानसिक भावना, निराशा आणि उत्साह हे चंद्राशी संबंधित आहेत. यामुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ न्यून असते, त्यांना पौर्णिमेच्या जवळपास मानसिक त्रास होण्याचे प्रमाण वाढते. ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ चांगले आहे, त्यांची पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, अशा वातावरणात प्रतिभा जागृत होते. त्यांना काव्य सुचते.चंद्र हा ग्रह मातृकारक आहे, म्हणजे कुंडलीतील चंद्रावरून मातेचे सुख अभ्यासतात. आश्‍विन पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने माता आपल्या ज्येष्ठ अपत्याला कृतज्ञताभावाने ओवाळते; कारण प्रथम अपत्य जन्मानंतर स्त्रीला मातृत्वाचा आनंद प्राप्त होतो.- सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News