मी उद्योजक होणारच! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा- तुषार जगताप


मी उद्योजक होणारच!  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा- तुषार जगताप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

राज्यातील शिक्षित अर्धशिक्षित युवक- युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात किमान एक लाख उद्योजक तयार करून त्यांच्या माध्यमातून दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून नवीन युवा उद्योजकांसाठी १ लाख ते ५० लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या सहभागातून या धोरणांतर्गत राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित करण्यासाठी उद्योग संचालनालय, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि वित्तीय संस्था या अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहेत.

या योजनेचा उद्देश छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे आहे त्यामुळे खाजगी क्षेत्रात स्वयम रोजगार निर्मिती करण्याचा या योजनेचा हेतू आहे. सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न ही योजना करणार आहे. या योजनेमुळे सर्वसमावेशक विकास होण्यासाठी मदत होणार आहे. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी प्रामुख्याने या योजनेने भर दिला आहे. या योजनेसाठी प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. हे प्रशिक्षण नामांकित संस्थांद्वारे घेण्यात यावे. या योजनेला राष्ट्रीयीकृत बॅंकांचा चांगला पाठिंबा आहे. मार्केटिंग सपोर्ट आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर नवीन व्यवसाय करू पाहणाऱ्या युवक-युवतींनी करावा.

महाराष्ट्र शासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही योजना आखली आहे. सहकारी, राष्ट्रीय आणि शेडयूल बँकांची भूमिका योजनेसाठी सर्वात महत्त्वाची राहणार आहे. या योजनेसाठी स्थानिक अधिवास असलेले किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे युवक-युवती पात्र ठरतील. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल असून पन्नास लाख रुपयापर्यंतचे प्रकल्प या योजनेसाठी पात्र ठरतील. राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान पंधरा टक्के ते पस्तीस टक्के पर्यंत मिळेल.

दहा लाखा वरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता सातवी पास असेल. तसेच २५ लाखावरील प्रकल्पांसाठी किमान शिक्षण दहावी पास आवश्यक असेल.

पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे जागतिक कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष तुषार जगताप यांनी सांगितले. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा MAHA CMEGP.GOV.IN या‌ वेबसाईट ला‌ भेट द्या असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News