थोडंसं मनातलं.... अहमदनगर मधील राजकीय भांडणाची नागरिकांना किळस आलीय... ॲड शिवाजी कराळे


थोडंसं मनातलं....  अहमदनगर मधील राजकीय भांडणाची नागरिकांना किळस आलीय... ॲड शिवाजी कराळे

नमस्कार मित्रांनो, अहमदनगर मधील सर्व शहर वासियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या देशभर कोविड-19 थैमान घालतोय. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सध्या कोविड-19 ने खुपच मोठ्या प्रमाणावर बाधीत आहे, परंतु रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे. खरं तर अहमदनगर शहरात सध्या अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यात रस्ता, पाणी,विज या बरोबरच घरपट्टी, पाणी पट्टी याची वसुली आणि शहरात असलेले अतिक्रमण इ.प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या अहमदनगर महापालिका भाजप च्या ताब्यात आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. एकीकडे राज्यात सत्ता असताना सुद्धा विकासाच्या कामाकडे पुर्णपणे लक्ष न देता स्थानिक पातळीवर सर्व पक्ष एकमेकांना पाण्यात पहात विनाकारण आपसात भांडण तंटा करताना दिसतात. स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारी वरून दुस-या पक्षातुन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेल्या  काका शेळके यांनी शिवसेनेच्या नेत्यावर टिका केली. वास्तविक आदरणीय मा.आ.अनिल भैय्या राठोड यांनी ठरवलेलेच उमेदवार स्वीकृत नगरसेवक होणार होते हे निश्चित होते. त्यामुळे शिवसेना पक्षात काही काळ आपसातील भांडण मिटवण्यात वेळ गेला. त्यानंतर भाजपचे नगरसेवक श्री मनोज कोतकर यांना स्थायी समिती सभापती पदी मिळाली, पण ते भाजपचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे असा वाद निर्माण झाला आहे. हे कमी की काय म्हणून अहमदनगर जिल्हा शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री किरण काळे यांनी अहमदनगर शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांचेवर गुंडगीरीचे आरोप केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचेतील भांडण चव्हाट्यावर आले. वास्तविक पाहता या मध्ये महसूल मंत्री आदरणीय श्री बाळासाहेब थोरात साहेब आणि शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांचे नावाचा सुद्धा वापर केला गेला.  काही दिवस जात नाही तोच पुन्हा एकदा शिवसेना मधील पदाधिकारी यांचेत सावेडी भागात घेतलेल्या कार्यक्रमात वाद निर्माण झाले. यामध्ये पुर्वाश्रमीचे भाजप मध्ये असणारे व सध्या शिवसेना पदाधिकारी असलेले आनंद लहामगे आणि  श्री वाकळे यांचेत वाद निर्माण झाले. ते प्रकरण थेट पोलिस स्टेशन पर्यंत गेले तसेच मराठा आणि वंजारी समाज यांचेत त्याचे पडसाद उमटले. वास्तविक पहाता एक नागरिक म्हणून जर विचार केला तर अशा राजकीय भांडणाची नागरिकांना आता किळस आलीय हे पण सत्य आहे. खरं तर आता सत्ता असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्र येऊन अहमदनगर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारचे माध्यमातून जेवढा जास्त निधी आणता येईल तेवढा आणला पाहिजे. शहरातील तरुणांना रोजगार कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सध्या कोविड-19 ने अनेक लोक आजारी आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषोधोपचार उपलब्ध करून दिला पाहिजे. शहरातील अनेक धनदाडंगे यांचेकडे असणारी करस्वरूपातील पट्टी वसूल करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, त्यामुळे महापालिकावर असणारा बोजा कमी होईल आणि नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील. शहरातील रस्ते, शासकीय हाॅस्पिटल चांगले कसे होतील या कडे लक्ष दिले पाहिजे. परंतु सध्या फक्त प्रसिद्धीसाठी प्रत्येक पक्षांकडून मोहीम हाती घेतली आहे असे स्पष्ट पणे वाटते. प्रत्येक नेत्यांनी आपला पक्ष वाढवलाच पाहिजेच या बद्दल आमचे दुमत नाही. तसेच सत्तेत येण्यासाठी सर्व गणिते जुळवून पाहिली पाहिजे यात सुद्धा नागरिकांना काही गैर वाटत नाही, परंतु बालीशपणा आणि आपसातील भांडण कुठेतरी थांबून शहरातील विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे तरच यापुढे लोकं राजकीय पक्षांना किंमत देतील अन्यथा लोक त्यांना निवडणुकीत आपली जागा दाखवून देतील हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. राजकीय पदाधिकारी यांनी दुस-या पक्षातील नेत्यावर टिका करताना सुद्धा उच्च दर्जाची टिका टिप्पणी केली पाहिजे. कमरे खालचे विनोदाने टिका टिप्पणी करणा-याची लायकी लगेच कळते. राजकीय भांडण हे प्याल्यातील वादळ असते. कारण राजकारणात फार काळ कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि मित्र ही नसतो याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा आहे. प्रत्येक पदाधिकारी यांनी स्वतःची लायकी तपासली पाहिजे. आपल्या शब्दाला आपल्या पक्षात किती किंमत आहे हे एकदा ठरवले पाहिजे. दोन तीन महिन्यात सर्व राजकीय पक्षांचे नेते भांडण तंटा करताना दिसतात ,यातुन फक्त नगरकरांची करमणूक झाली. काही भांडण तंटा पोलिस स्टेशन पर्यंत गेले, परंतु त्याचा काही उपयोग नाही, कारण रोजच अशा प्रकारे घटना घडतच असतात, भांडण किती खरे आणि किती खोटे असते याची जाणीव पोलिस प्रशासन यांना अगोदरच असते. केवळ एकमेकांची जिरवाजिरवी करायची म्हणून गुन्हे दाखल करण्यात येतात परंतु बिचारे कार्यकर्ते नाहक गुन्ह्यात अडकले जातात हे दुर्दैव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयमाने घेतले पाहिजे. एक मात्र निश्चितच आहेकी कोणताही राजकीय नेते मंडळी लोकांना सोयी सुविधा मिळतील म्हणून एका पक्षातुन दुस-या पक्षात उडी मारत नाही तर ते फक्त स्वतः च्या सोयीसाठी आणि राजकीय अस्तित्व टिकावे म्हणूनच पक्षांतर करत असतात. अहमदनगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे त्याला युपी, बिहार ची उपमा देणे योग्य वाटत नाही. अनेक समाजाची लोकं इथे गुण्यागोविंदाने रहात आहेत. अहमदनगर शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. झाले एवढे पुरे झाले ,आता तरी नगर शहरातील लोकांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांना विनंती आहे. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

मा.अध्यक्ष वकील संघ अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News