यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने नगररचनाकार चारठाणकर यांच्या निलंबनाची मागणी!! भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आयुक्तांना निवेदन..अन्यथा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा


यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने  नगररचनाकार चारठाणकर यांच्या निलंबनाची मागणी!! भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आयुक्तांना निवेदन..अन्यथा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा

महापालिकेतील नगर रचनाकार आर. एल. चारठाणकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना देताना अध्यक्षा रेखा जरे पाटील, भिंगार समन्वयक रोहिणी वाघीरे, विद्यार्थी समन्वयक मनिषा गायकवाड. (छाया-वाजिद शेख-नगर)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) महापालिकेतील नगर रचनाकार आर. एल. चारठाणकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. महिला ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, भिंगार समन्वयक रोहिणी वाघीरे, विद्यार्थी समन्वयक मनिषा गायकवाड उपस्थित होत्या.

आर. एल. चारठाणकर महापालिकेत आल्यापासून प्रचंड भ्रष्टाचार सुरु झाला आहे. नगररचनाकार हे पद मनपामध्ये असताना त्यांची नेमणूक बेकायदेशीर झाली आहे. नगरमध्ये लेआउट मंजूर करताना कुठेही ओपन स्पेस मध्यभागी ठेवण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात जागेवर ओढे-नाले असताना ते गायब करून मंजुर्‍या दिल्या जातात. चारठाणकर मोठे डेव्हलपर्स, बिल्डर्स यांच्याकडून जागेच्या मंजुरीसाठी लाखोच्या तडजोडी करीत आहे. मंजूर केलेले अनेक ले आउट प्लॅनमध्ये सावळा गोंधळ असून, याची तपासणी केल्यास सर्व पितळ उघडे पडणार आहे. नगररचना विभागातील कनिष्ठ कर्मचारी, क्लार्क, शिपाई यांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत प्रकरणे तयार करून बेकायदेशीर मंजुर्‍या दिल्या जात आहे. तडजोडीसाठी रात्री उशिरापर्यंत त्यांचे कार्यालय सुरु असते.नगररचना विभागासाठी आयुक्तांची दिशाभूल करून त्यांनी खास कर्मचार्‍यांच्या बदल्या करून घेतल्या व त्यांच्या मार्फत राजरोसपणे जनतेची लूट चालू आहे. चुकीच्या मार्गाने टीडीआर वाढवून बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीरपणे मंजुरी दिलेल्या आहेत. सीना नदीची पूर नियंत्रण रेषा निश्‍चित होऊनही त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहे. नियमात पळवाट काढून या नगररचना विभागात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.  

चारठाणकर हे नगररचनाकार पालिकेत हजर झाल्यापासून त्यांनी मंजूर केलेले लेआउट, ओपन स्पेस, ओढे-नाले सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेतील परवानग्या, कर्मचारी कामकाज वाटप, टीडीआर, बांधकाम परवानगी, ना हरकत दाखले इत्यादींची स्वतंत्र अधिकारी नेमणूक करून तातडीने चौकशी करावी. तसेच त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. आठ दिवसात चारठाणकर यांच्यावर कारवाई न झाल्यास महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News