महात्मागांधी रोजगार हमी योजनेतुन प्रत्येक ग्राम समृद्ध करून आदर्श गावाची निर्मिती करा :- आमदार आशुतोष काळे


महात्मागांधी रोजगार हमी योजनेतुन प्रत्येक ग्राम समृद्ध करून आदर्श गावाची निर्मिती करा :- आमदार आशुतोष काळे

मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी ऑनलाईन बैठकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

ज्या मजुरांच्या हाताला काम नाही अशा मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देवून मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व  जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक सरपंचांनी मनरेगा योजनेची अंमलबजावणी करावी व आपले गाव समृद्ध करून आदर्श गावाची निर्मिती करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी संपर्क नवी उमेद या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात संस्थेच्या मेधा कुलकर्णी, प्रमोद झिंजाडे, एम.एन.कोंढाळकर, शरद अरगडे, मृणाली जोग यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. या शिबिराच्या समारोप प्रसंगी या बैठकीसाठी सहभागी झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

ते म्हणाले की, प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी शासनाने मनरेगा योजना सुरु केलेली आहे. या योजनेच्या सहाय्याने जलसंधारणची कामे करून आपली गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. त्या माध्यमातून ओढेनाले खोलीकरण, रुंदीकरण, मोठे  साठवण तळे आदी कामे केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहजपणे मार्गी लागू शकतो. तसेच मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची कामे देखील देता येवू शकतात. यामध्ये वृक्षलागवड, शाळा वालकंपाऊंड करणे, स्मशानभूमी शेड बांधणे तसेच फळबाग उभारणी, वृक्षलागवड व पशुपालनासाठी गोठे बांधणे अशा प्रकारचे अनेक कामे या मनरेगा योजनेच्या माध्यमातून बाराही महिने केली जाऊ शकतात. त्यामुळे एकीकडे रोजगार नसणाऱ्या मजुरांना १२ महिन्यासाठी रोजगार उपलब्ध होतो. व त्याचबरोबर गावचा देखील सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व सरपंचांनी आपल्या गावात प्राधान्याने मनरेगा योजना राबविली पाहिजे. या योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने असल्याने भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही. आपले गाव खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी बालक व महिला व्यवस्था मजबूत करण्यासाठी समिती स्थापन करून त्या समितीवर स्वतंत्रपणे जबाबदारी टाकावी. महिला व बालक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करावी आदी सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत दिल्या. मनरेगा योजना राबवितांना ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण झाल्यास या अडचणी दूर करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून माहिती घ्यावी व आपल्या गावात नियमितपणे हि मनरेगा योजना सुरु राहील यासाठी सर्व सरपंचांनी प्रयत्न करावे. ज्या सरपंचांना काही तांत्रिक अडचणी निर्माणझाल्यास जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी त्या अडचणी सोडवाव्यात अशा सूचना केल्या. आमदार आशुतोष काळे यांनी प्रथमच अशा प्रकारे बैठक आयोजित करून मनरेगा योजनेची सविस्तरपणे माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे प्रत्येक गावात हि योजना राबविली जाऊन गाव समृद्ध होण्यास मदत होणार असून त्याबद्दल सर्व सरपंचांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

- कोणतीही शासकीय योजना राबवायची असेल तर त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सबंधित व्यक्तीला त्या योजने संदर्भात परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आमदार आशुतोष काळे यांनी मनरेगा योजने संदर्भात बैठक आयोजित करून मिळालेल्या मार्गदर्शनातून निश्चितपणे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होऊन गावे समृद्ध करण्याची आमदार आशुतोष काळे यांची यातून तळमळ दिसून येत आहे.

-सुधाकर दंडवते जिल्हा परिषद सदस्य


जाहिरात
Search
विडिओ
Recent News