पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात; ४ गावठी पिस्तूल जप्त


पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात; ४ गावठी पिस्तूल जप्त

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांची कारवाई

मिलिंद शेंडगे, पुणे : पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष पुणे ग्रामीण यांनी शिरूर येथे मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पुढील कारवायांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह वालचंदनगर-भिगवण हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर यांना बातमीदाराद्वारे दोन इसम वालचंदनगर भिगवण परिसरामध्ये पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्टाफ यांच्या मदतीने मुक्तार अजीज शेख (वय १९ वर्षे), योगेश कचरू धोत्रे (वय २१ वर्ष, दोघेही रा. गोधेगाव ता. नेवासा, जि. अ.नगर) यांना येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

    सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार वालचंद नगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंदनगर पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, विश्वास खरात, राजेश पवार, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन स्टाफ पोलीस हवालदार प्रकाश माने, विशाल निर्मळ, नितीन कळसराइत व विजय शेंडकर यांच्या पथकाने केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News