पाटस मंडल अधिकार्‍याच्या त्रासाने शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा


पाटस मंडल अधिकार्‍याच्या त्रासाने शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

मृत्यूस मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के यांना जबाबदार धरण्यात यावे : दगडे कुटुंबीयांची मागणी

मिलिंद शेंडगे, पाटस : दौंड तालुक्यातील मौजे पाटस येथील सर्वे नंबर ५०० - ब येथील शेतजमिनीमध्ये येण्या-जाण्यासाठी चंद्रकला बाळासाहेब दगडे व सोनाली सुनील दगडे यांनी तहसीलदार, दौंड यांच्याकडे २२ मार्च २०१६ रोजी रस्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याकडे कलम १४३ एस आर /११/२०१६ प्रमाणे बापू नामदेव टिळेकर व राजकुमार गणपत नाळे व बबन मल्हारी टिळेकर यांच्या गट नंबर ५२२अ/१ आणि गट नंबर ४०७/२ या जमिनीच्या बांधावरून दहा फूट रुंदीचा रस्ता मिळणेबाबत दगडे यांनी अर्ज केला होता. सर्व बाबींचा विचार करून तहसीलदार यांनी दिनांक ६ जून २०१८ रोजी आदेश देत अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र दगडे कुटुंबीयांना अद्याप रस्ता मिळाला नाही. 

     त्या रस्त्याची प्रतिक्षा आजही सुरुच असून गट नंबर ५२२ - ब मध्ये दगडे यांना जाणे-येणे साठी ५२२अ/१ आणि ४०७/२ गटाच्या सर्वे नंबरच्या बांधावरून पूर्व-पश्‍चिम लांबीचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सदर आदेशाची संबंधितांना नोटीशीव्दारे समज देण्यात यावी असा आदेश दिलेला असताना पाटस मंडल अधिकारी म्हस्के यांनी अद्यापही त्यांना आदेश असणारा रस्ता खुला करून दिला नाही. यासंबंधी दगडे यांनी म्हस्के यांच्या मागणीनुसार त्यांच्याशी आर्थिक तडजोडही केली. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने दगडे यांनी मंडल अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनाच शिवीगाळ करून पोलिस चौकीत तक्रार करेन अशी धमकी देत हाकलून देण्यात आले.

    त्यामुळे दगडे कुटुंबियांचे आर्थिक, मानसिक व शारिरीक नुकसान होत असून दगडे कुटुंबांनी उपविभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे व माझ्या मृत्युस पाटसचे मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के जबाबदार आहेत असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

   पाटस मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के यांच्या विरोधात दिवसेंदिवस गोरगरीब शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढत असून कार्यालयात ये-जा करणार्‍या लोकांना मदत मिळण्याऐवजी शिवीगाळ व दमदाटी सहन करावी लागत आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने व प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या मंडल अधिकार्‍याच्या मुजोरीपणाकडे जिल्हा प्रशासन मुद्दाम कानाडोळा करत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. पाटसचे मंडल अधिकारी कार्यालय सध्या केवळ आर्थिक देवाण-घेवाण केंद्रच बनले असून अशा भ्रष्ट अधिकार्‍याची त्वरीत बदली करावी अशी मागणी पिडीत व त्रस्त नागरीक करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News