पोट हिश्श्याची स्वतंत्र उल्लेख असल्याची नोंद उताऱ्यावर यावी यासाठी बैठक घ्या !! आ. आशुतोष काळे


पोट हिश्श्याची स्वतंत्र उल्लेख असल्याची नोंद उताऱ्यावर यावी यासाठी बैठक घ्या !!  आ. आशुतोष काळे

तिसऱ्या जनता दरबारात मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

आमदार आशुतोष काळेंची महसूल विभागा ला सुचना

 वर्षानुवर्षाच्या भाऊबंदकीला कायमचा आळा बसावा व पोट हिश्श्याचे वाद निकाली निघावे यासाठी जमिनीच्या उताऱ्यावर पोट हिश्श्याचा स्वतंत्र उल्लेख होऊन त्याची नोंद उताऱ्यावर लावण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यांचे वाद आहे अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर पोट हिश्श्याची लवकरात लवकर नोंद झाली पाहिजे यासाठी तातडीने बैठक घेऊन उताऱ्यावर पोट हिश्श्याच्या नोंदी लावण्यासाठी कार्यवाही सुरु करा असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी महसूल, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक व भूमीलेख विभागाला दिले आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, भूमीअभिलेख विभाग व महसूल विभागाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निकष पाळून कोपरगाव तहसील कार्यालय येथे जनता दरबार घेतला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, मागील सात महिन्यापासून देशात व राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे १० मार्च रोजी दूसरा जनता दरबार झाल्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे जनता दरबार घेता आला नाही. मागील दोन जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. जून महिन्यापासून अनलॉक सुरु झाले व घातलेली बंधनं शिथिल करण्यात आली. त्यामुळे उर्वरित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी जनता दरबार घेतला. कोरोनाच्या नावाखाली अनेक सरकारी कार्यालये बंद होती तर अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होती व काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा देखील झाली होती. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. त्यामुळे मुद्दामहून जनता दरबार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या जनता दरबारात घरकुल खरेदीसाठी गुंठेवारी खरेदी सुरु असल्याबाबत तसेच भूमीअभिलेख कार्यालयाचे प्रलंबित प्रश्नांचा आमदार आशुतोष काळे यांनी आढावा घेतला. यावेळी अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले यामध्ये मुद्रांक मिळत नाही. मुद्रांकाचा काळा बाजार होऊन जास्त रक्कम देऊन मुद्रांक खरेदी करावे लागतात. वारंवार मागणी करूनही नवीन सोसायटी स्थापन करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नाहरकत दाखला मिळत नाही. सेतू कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मनाप्रमाणे पैसे घेतले जातात त्याची पावती दिली जात नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी करतांना एम.एस.पी.दरापासून सुरुवात होत नाही. भाजीपाला गंजावर विकला जातो, किलोवर विकला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांकडून तोलाईचे पैसे काढले जातात. शेतकऱ्यांच्या मालाची एम.एस.पी.दरापासून सुरुवात होत नाही याची दखल घेतली जात नाही. औद्योगिक वसाहतीत अनेक मोकळे भूखंड असून हे भूखंड बेरोजगारांना दिले जात नाही. अनेक गावात शिवरस्त्यांवर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे गावचा शिव रस्ता हरवला आहे. शिवरस्त्यांची मोजणी करून अतिक्रमण धारकांवर कारवाई तसेच गावठाण जमिनीवर अतिक्रमण काढून गावठाण जमिनीची मोजणी करून द्यावी असे अनेक प्रश्न नागरिकांनी या जनता दरबारात मांडले. यामध्ये डॉ.अजय गर्जे, समाजसेवक संजय काळे, राजेंद्र खिलारी, मनसेचे अनिल गायकवाड, सचिन रोहमारे, विलास दवंगे, रामदास महाले आदी नागरिकांनी दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक,भूमीअभिलेख विभाग व महसूल विभागाच्या संदर्भात आपल्या समस्या मांडल्या. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्या शीघ्र गतीने सोडविण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे सांगितले. तसेच रेशनचा काळा बाजार करून गरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले . यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, सुनील शिंदे, सचिन रोहमारे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, राहुल रोहमारे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, नगरसेवक अजीज शेख, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, डॉ. अजय गर्जे, सरपंच शशिकांत वाबळे, प्रशांत वाबळे, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, रावसाहेब साठे, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र खिलारी, नायब तहसीलदार योगेश कोतवाल, दुय्यम निबंधक दिलीप नीऱ्हाळी, सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळे, भूमी अभिलेख विभागाचे संजय भास्कर आदी उपस्थित होते.यावेळी तहसील विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना. इंदिरा गांधी अपंग योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आदेश वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.


चौकट:१- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे प्रशासकीय कार्यालयातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सुरु केलेला जनता दरबार या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लागत आहे. या जनता दरबारामुळे प्रशासकीय कार्यालयात सुरु असलेला काळा बाजार व भ्रष्टाचार निश्चितपणे हद्दपार होणार आहे त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु केल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार -मनसे नेते संतोष गंगवाल    


.  


जाहिरात
Search
विडिओ
Recent News