पाटस मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विरोधात तक्रार दाखल!!


पाटस मंडल अधिकारी व तलाठी यांच्या विरोधात तक्रार दाखल!!

कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यांना शिवीगाळ व कलम ३५३ ची धमकी

मिलिंद शेंडगे, पाटस : दौंड तालुक्यातील पाटसचे मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के व तलाठी शंकर दिवेकर यांनी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतजमीनीची दप्तरी बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी तक्रारदार प्रशांत ठोंबरे यांनी बुधवार (ता.०७) रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील शेतजमीनीचा मिळकत गट क्रमांक १४७ ब, २८७/६ व २८८/२ या तीन मिळकती संदर्भात तलाठी यांनी नोंद केलेला फेरफार क्र. १५४१३ बाबत प्रशांत ठोंबरे यांनी हरकत घेत मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित शेतजमीनीच्या फेरफार व तीन गट क्रमांकावर मृत्यूपत्राप्रमाणे नोंद करण्याची मागणी पाटसचे मंडल अधिकारी म्हस्के यांच्याकडे केली होती. यावेळी मंडल अधिकारी यांनी ३१ जुलै रोजी विरोधात निकाल दिल्याने तक्रारदार यांनी दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे अपील केले होते. यावेळी पाटसचे मंडल अधिकारी यांच्या आदेशास स्थगिती व आदेश रद्द करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती.

    यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तक्रारीची सुनावणी घेऊन ९ सप्टेंबर रोजी सदर तक्रारीबाबत मंडल अधिकारी यांच्या निर्णयाबाबत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशा प्रकारे "जैसे थे" आदेश दिले होते. सदर आदेशाची प्रत पाटसचे तलाठी शंकर दिवेकर व मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के यांना अनुक्रमे ९ व १० सप्टेंबर रोजी देण्यात आली होती. गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान करत अधिकाराचा गैरवापर केला व तक्रारदार यांचा कायदेशीर हक्क डावलून तलाठी व मंडल अधिकारी यांनी हेतूपुरस्कर, आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाविरुद्ध कामकाज करत शेतजमीन ७/१२ व फेरफार क्रमांक १५४१३ च्या दप्तरी २४ सप्टेंबर रोजी बेकायदेशीर नोंद केली. 

    तसेच तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत मंडल अधिकारी म्हस्के यांना विचारणा केली असता त्यांनी तक्रारदारांना शिवीगाळ व दमदाटी केली. माझी "वर" पर्यंत ओळख आहे अशी बतावणी करत सदर बेकायदेशीर नोंदी संदर्भात कोठे तक्रार केली तर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवीन अशी धमकी दिली असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. मंडल अधिकारी म्हस्के व तलाठी शंकर दिवेकर यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी फेरफार व ७/१२ दप्तरी बेकायदेशीर नोंद केली आहे. यामुळे तक्रारदार यांच्या मालकी हक्कावर व नैसर्गिक न्यायहक्कावर गदा आल्याने मोठे नुकसान झाले आहे व तक्रारदार यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला आहे.

   दरम्यान, मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के व तलाठी शंकर दिवेकर यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी व दौंड तहसीलदार यांच्याकडे मंगळवार (ता.०६) रोजी लेखी तक्रारीव्दारे केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के यांना राजकिय पाठिंबा असल्याने वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता ते मनमानी कामकाज करत आहेत.

वरिष्ठांनी मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर कडक कारवाई न केल्यास लवकरच आंदोलन करणार आहे.

--  प्रशांत ठोंबरे (तक्रारदार, पाटस)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News