विवाह सोहळ्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी. मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड असोसिएशनची मुख्यमंत्रांकडे मागणी.


विवाह सोहळ्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी. मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड असोसिएशनची मुख्यमंत्रांकडे मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी, महानगर पालिकेने सर्व कर माफ करावे, बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी तसेच वीज मंडळाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन मंगल कार्यालय चालक, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल द्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विविध असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन या मागण्या त्यांच्या समोर प्रत्यक्ष पणे किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मांडण्यात येणार आहेत असे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जाहीर केले.


येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंगल कार्यालय चालक, केटरर्स, मंडप व लाईट डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स, बँड, गेट पॅकेज, घोडा, बग्गी, सनई चौघडा अशा विविध असोसिएशनचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. 


महाराष्ट्र शासन ३०० स्केअर फूट आकाराच्या एस.टी. बस मध्ये ५० प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी देते मग दहा हजार स्केअर फूट  ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी ५०० लोकांना उपस्थित राहण्याचा परवानगी का देत नाही ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. एका लग्न सोहळ्याद्वारे सुमारे ३५० लोकांना रोजगार मिळतो. जिल्ह्यामध्ये किमान ७०० मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे शासनाने जर परवानगी दिली तर लाखो लोकांना रोजगार मिळु शकतो. थांबलेले अर्थचक्र वेगाने फिरू शकते. त्याचा फायदा अप्रत्यक्ष रित्या शासनाला कर रूपाने होणार आहे. याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा.मंगल कार्यालय चालक व विवाह सोहळ्याशी संबंधित सर्व यंत्रणा सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर चा वापर करणे, टेम्प्रेचर चेक करणे, मास्क चा वापर करणे, अशा कोव्हीड शी संबंधित सर्व नियम व अटींचे पालन करून मंगल कार्यालये चालविणार असल्याची लेखी हमी देत आहे. तरी शासनाने या मागण्यांचा विचार करावा. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मध्यम लघु उद्योगासाठी २० लाख कोटी रुपयांची निधी मंजूर केला आहे. मात्र त्याचा उपयोग मंगल कार्यालये चालक, केटरिंग असोसिएशन अथवा विवाह सोहळ्याशी संबधीत कुठल्याही यंत्रणांना अद्याप झालेला नाही. केटरिंग, मंडप, लाईट, डेकोरेशन आदी व्यावसायिकांना कुठलीही बँक सध्या कर्ज देत नाही. उलट या व्यावसायिकांना सर्व राष्ट्रीय कृत बँकांनी सध्या काळ्या यादीत टाकले आहे. 


केंद्र शासनाच्या निर्णयानुसार २०० लोकांना, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १०० लोकांना तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५० लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यास लेखी परवानगी आहे मात्र केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात होत नाही. त्यामुळे मंगल कार्यालये चालक व संबधीत अधिकारी यांच्यामध्येच या परवानगी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम देखील दूर झाला पाहिजे. व तसा सुधारित शासन निर्णय शासनाने जारी करावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी पासून मंगल कार्यालये चालक पुढील बुकिंगवर पूर्णपणे बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक मदन आढावा यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीस माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब बोराटे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव, चंद्रकांत फुलारी, राजेंद्र उदागे, अजय नरवडे,  गणेश भुतारे, विश्वजित बोरा, चंद्रकांत मेहेत्रे, शांताराम राऊत, रमेश परतानी, सुरेश खरपुडे, प्रदिप शेठ पंजाबी, सुरेश रोकडे, अतुल जाधव, संजय जाधव, सूरज पडळे, अलीम सय्यद, नयूम शेख, बिलाल शेख, कय्युम शेख, सागर जाधव, अशोक काटकर, निशांत भोगे, रघुनाथ चौरे, सुनिल अरकल, पोपट राऊत, दिलावर शेख, संजय आकुबत्तीन, सुनिल साळवे यांच्यासह विविध असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News