महात्मा गांधी जयंती निमित्त घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी ताबा गुंठा योजना कार्यान्वीत..आत्मनिर्भर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प


महात्मा गांधी जयंती निमित्त   घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी ताबा गुंठा योजना कार्यान्वीत..आत्मनिर्भर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) केंद्र व राज्य सरकार पंतप्रधान आवास योजना राबविण्यास असक्षम ठरत असताना, घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त लॅण्ड पुलिंग योजनेच्या धर्तीवर ताबा गुंठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांच्या उपस्थितीमध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन करुन स्वत:चे हक्क स्वत: मिळवणार असल्याची घोषणा देऊन आत्मनिर्भर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, हिराबाई ग्यानप्पा, सुमन जोमदे, अंबाबाई जुमेवाळे, तानाबाई हाथरुणकर, सुनिता गटी, नलूबाई पैलवान, प्रमोद वाळके, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम उपस्थित होते.       

सरकार घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे. जो सरकारवर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. महात्मा गांधी यांनी आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला होता. तो संदेश आजही सर्व वंचितांसाठी प्रेरक आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. अनेकांना स्वत:च्या मालकीची घरे नाहीत. या परिस्थितीमध्ये सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांसाठी प्रकल्प राबविणे आवश्यक होते. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने स्वत: पुढाकार घेऊन ताबा गुंठा योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरा जवळील गावात खडकाळ पड जमीनीवर घरकुल वंचितांना अल्पदरात 1 गुंठा जागा देण्याचा मानस आहे. यासाठी शेतकर्‍यांकडून खडकाळ पड जमीन या योजनेसाठी घेऊन त्यावर लेआऊट प्लॅन टाकून त्या जागेचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. तर बाजारभावाच्या निम्म्या किंमतीमध्ये घरकुल वंचितांना प्लॉट मिळणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

तसेच भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास झाल्यास देशाचा विकास होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांचा विकास साधला गेला पाहिजे. यासाठी ग्रामपीठाची स्थापना करण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. ग्रामपीठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे तंत्र, शेती मालाचे ब्रॅण्डिंग, शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे देखील संघटना प्रयत्नशील आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News