संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देवून सर्व पंचनामे करून घेतले होते. व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या सुरु असलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकार देणार असून हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून गोदावरी नदीला पूर देखील आला होता. त्यामुळे काढणीला सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन,बाजरी,मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे त्या पिकांचे देखील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ६ कोटी नुकसान भरपाई मिळावी यासाठी मदत, पुनवर्सन खात्याकडे आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून कोपरगाव तालुक्याला पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून हि रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत असतांना व मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मागील वर्षीप्रमाणे अतिवृष्टी व पुर येवून मागील वर्षीची पुनरावृत्ती होते कि काय? या विवंचनेत शेतकरी सापडला असतांना महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, मदत,पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार,महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे.