डॉ. कोठारी यांनी सुरु केलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करतांना आमदार आशुतोष काळे.
संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोरोना संकटात कोपरगाव शहरातील सर्व डॉक्टरांनी कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना सेवा देऊन मोलाचे सहकार्य केले असून सामाजिक दायित्व जोपासतांना डॉ.कोठारी यांनी २५ बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. डॉक्टर हे रुग्णांसाठी देवदूतच असतात हे डॉ.कोठारी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव येथे डॉ. रमेश कोठारी यांनी कोठारी हॉस्पिटल येथे सुरू केलेल्या २५ बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये यशस्वी उपचार केले जात असून अनेक रुग्ण उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत.मात्र मागील चार महिन्यापासून अनलॉक सुरु झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध होणार आहे. डॉ.कोठारी यांनी सुरु केलेले कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी तालुक्याच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी सर्व अत्यावश्यक सुविधायुक्त हॉस्पिटल सुरू करणे कौतुकास्पद आहे. या जीवघेण्या संकटात सर्वच खाजगी डॉक्टर आपल्या जीवावर उदार होऊन करीत असलेली रुग्णसेवा हि निश्चितपणे ईश्वरसेवेपेक्षा कमी नाही. असे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी काढले.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे श्री.दत्तगिरी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,नितीनदादा कोल्हे,राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,जी.प. सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर,निमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.तुषार गलांडे,कोठारी हॉस्पिटलचे डॉ.रमेश कोठारी, डॉ. योगेश कोठारी,डॉ.कुणाल कोठारी,डॉ.उमेश कोठारी, डॉ. अतिष काळे,डॉ.अजय गर्जे,डॉ. चंद्रशेखर आव्हाड,डॉ. उंबरकर आदी उपस्थित होते.