पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या उपक्रमांचा आढावा
वृक्ष संवर्धनासाठी बैठकित नियोजन
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची राज्यस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (गुगलमीट) नुकतीच पार पडली. निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष तथा वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. तर लावलेली झाडे जगविण्यासाठी नियोजन करण्यात आले. या बैठकित महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले असल्याची माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख पै. नाना डोंगरे यांनी दिली.
वृक्षमित्र मोरे यांच्या शहरातील संपर्क कार्यालय येथून ही बैठक पार पडली. सामाजिक भावनेने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेल्या निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या संपर्क कार्यालयासाठी चंदुकाका सराफचे अतुल शहा यांनी लॅपटॉप, प्रिन्टर व पेड झुम मिटींगचे सॉफ्टवेअर भेट दिले. सदर साहित्य नगर येथील चंदुकाका सराफचे आनंद कोठारी यांनी वृक्षमित्र मोरे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसुळ, जिल्हा कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, वैभव मोरे आदि उपस्थित होते.आबासाहेब मोरे म्हणाले की, निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी व सदस्य पर्यावरण संवर्धन हे एकच ध्येय समोर ठेऊन कार्य करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून, ते जगविण्यासाठी देखील वर्षभराचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यात बीजरोपण मोहिम राबविण्यात आली असून, त्याचा देखील चांगला परिणाम मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आज केलेले कार्य भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. तर संघटनेच्या उपक्रमासाठी चंदुकाका सराफचे अतुल शहा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. अतुल शहा यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, यासाठी राज्यभर संघटनेच्या कार्याने आपण भारावलो आहे. अनेक संघटना सामाजिक कार्यात गुंतले असून, पर्यावरण संवर्धन हे मोठे सामाजिक कार्य आहे. या कार्यासाठी आपण सहकार्य केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य कार्याध्यक्ष विलास म्हाडिक यांनी मंडळाच्या या वर्षीच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. या बैठकित राजेंद्र सावंत, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रियवंदा तांबटकर, विलास शेडाळे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, नाना पाटील, बाबासाहेब महापुरे, अॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडे, उमाजी बिसेन, सुहास गावीत, रामदास खवसी, कचरु चांभारे, बाळासाहेब चोपडे, अनिल लोखंडे, संजय भापकर, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, तावरे, कुंभकर यांनी सहभाग नोंदवला. आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञाचे वाचन करुन बैठकिचा समारोप झाला.