शासन स्तरावर ग्रामपीठांना अधिकार मिळण्यासाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त काळीआई ग्रामपीठ आंदोलन


शासन स्तरावर ग्रामपीठांना अधिकार मिळण्यासाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त काळीआई ग्रामपीठ आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - शासन स्तरावर ग्रामपीठांना अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शुक्रवार दि. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त काळीआई ग्रामपीठ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भारतात शेतीमध्ये नव्याने 10 कोटी युवकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. सुशिक्षितांना शेतीमध्ये मोठी संधी आहे. शेतीला दुय्यम दर्जा देण्यात आल्याने शेतकर्‍यांची प्रतिष्ठा कमी झाली. ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांनी शहराकडे धाव घेतली. सामाजिक प्रतिष्ठेचे वाटप चुकीच्या पध्दतीने झाल्याने, शेतकरी अन्नदाता असला तरी त्याकडे पहाण्याचा  दृष्टीकोन बदलला आहे. शहरी लोकांनीच स्वत:चे हित साधण्यासाठी निसर्गाचे समतोल बिघडवले. त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग सारखे गंभीर प्रश्‍न उभे राहिले आहे. कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले, नोकरी गेल्याने अनेक सुशिक्षित शेतीकडे वळाले. यातून अनेकांना शेतीचे महत्त्व कळले असून, शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी गावागावात सुरु करण्यात येणारे ग्रामपीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शेतीला आधुनिक करुन विकास साधण्याचा हा प्रयत्न असून, खेड्याकडे चला हा मंत्र घेऊन ग्रामपीठ कार्यन्वीत केले जाणार आहे. ग्रामपीठाची उभारणी संत ज्ञानेश्‍वर यांच्या पसायदानावर अवलंबून असणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अ‍ॅक्ट 1958 तरतुदी नुसार कलम 45 (6) अ प्रमाणे राज्य सरकारने ग्रामपीठांना परवानगी देण्याची गरज आहे. तसेच गावातील ग्रामसभेने ठराव घेऊन ग्रामपीठ कार्यान्वीत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. ग्रामपीठ लोकसहभागातून शेतीला चालना देणार आहे. बहुद्देशीय पध्दतीचे हे ग्रामपीठचे कामकाज चालणार असून, आधुनिक शेतीच्या तंत्रासह जोड धंदे, शेती उत्पादन मालाचे ब्रॅण्डिंग, पाण्याचे नियोजन आदिंचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. ग्रामपीठासाठी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, निवृत्त महसुल उपायुक्त प्रल्हाद कचरे, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड.सतीशचंद्र राक्षे, विलास लामखडे, ओम कदम आदि प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News