निकष बाजूला ठेवून, शेतकऱ्यांना मदत द्या !! आ.आशुतोष काळेंची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी !!


निकष बाजूला ठेवून, शेतकऱ्यांना मदत द्या !!  आ.आशुतोष काळेंची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी !!

अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना मदत मिळावी याबाबत मदत, पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

   मागील काही दिवसांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत, पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. संपूर्ण राज्यासह कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसतांना देखील अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पिके उभी केली होती. अनुकूल हवामान व वेळेवर झालेल्या पर्जन्यमानामुळे सर्वच पिकांचे भरघोस उत्पन्न मिळेल अशी सर्वत्र परिस्थिती होती. मात्र होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.२०१९ मध्ये देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सुरु असलेले कोरोना संकट व होत असलेला मुसळधार पाऊस यामुळे याहीवर्षी शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल अशी शक्यता मावळली आहे. मोठ्या आर्थिक संकटात देखील शेतकऱ्यांनी  खरीपाचा हंगाम घेतला होता या खरिपाच्या हंगामावर शेतकरी रब्बी हंगामाचे स्वप्नं पाहत होता. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्नं उध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. मागील काही वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना उमेद देवून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. संपूर्ण मतदार संघात दररोज होत असलेल्या अतिवृष्टीमुळे  सर्व ओढे नाले फुटून पाणी सखल भागातील शेतातील उभ्या पिकात साचून राहत असल्यामुळे पिके सडून चालली असून निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आग्रही मागणी केली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली त्याप्रमाणे झालेल्या नुकसानीचे अहवाल मागवून याहीवर्षी शेतकऱ्यांना भरघोस मदत देवून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत,पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News