प्रगतशील शेतकरी निर्माण करुन एक गाव एक ब्रॅण्ड विकसीत करण्याचा संकल्प
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने गाव तिथे ग्रामपीठ या योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला असताना याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने संघटनेच्या वतीने गावा-गावात गोठ्यातून ग्रामपीठाचे कामकाज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ग्रामपीठाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी निर्माण करुन एक गाव एक ब्रॅण्ड विकसीत केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
गावागावात सुरु करण्यात येणार्या ग्रामपीठाचे काम गोठा ते ग्लोबल असे चालणार आहे. या ग्रामपीठाच्या माध्यमातून शेतकर्यांना आधुनिक शेतीची माहिती, शेती व ग्रामविकासासाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती, शेती पुरक अद्यावत उद्योगधंदे, शेती उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आदि विषयावर सर्वसामान्य शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक गावात काहीतरी विशेष पिकवून त्याचे ब्रॅण्डिंग या ग्रामपीठाच्या माध्यमातून केले जाणार आहे. शेती व त्यास पुरक उत्पादनाचे एक गाव एक ब्रॅण्ड विकसीत केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपीठाच्या माध्यमातून दूध, शेती उत्पादने, धान्य व फळे याचे ब्रॅण्डिंग केल्यास शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळून शेती फायद्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे प्रगतशील शेतकरी तयार करण्याचे काम केले जाणार असून, हे एक प्रकारे प्रशिक्षण केंद्राची भूमिका पार पाडणार आहे. तसेच ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या सदृढ आरोग्याच्या दृष्टीने व्यायामाचेही धडे दिले जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या ग्रामपीठासाठी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, निवृत्त महसुल उपायुक्त प्रल्हाद कचरे, शाहीर कान्हू सुंबे, अॅड.सतीशचंद्र राक्षे, विलास लामखडे आदि प्रयत्नशील आहेत.