पद्मभुषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती निमित्त !!


पद्मभुषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती निमित्त !!

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

आण्णांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापुर जिल्हा तिल कुंभोजगावी झाला तसे सांगली जिल्ह्यातील "ऐतवडे" हे त्यांचे मूळगाव.त्यांचे प्राथमिक शिक्षण "विटा" या गावी झाले. 

पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला व ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. भाऊराव पाटलांनी ओगले ग्लास वर्क्सर,किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम करीतअसताना संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्रयाची,भयंकर अज्ञानाची व अंधश्रद्धेची जाणीव झाली. त्यांच्या या बहुतेक समस्यांवर "शिक्षण" हा एकमेव महत्त्वाचा उपाय आहे असा विचार त्यांनी केला.

ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी १९१९ मध्ये "रयत शिक्षण संस्थेची" स्थापना केली. सर्व जातीच्या मुलांना, गरीब शेतक-यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे असा प्रयत्न त्यांनी केला. संस्थेच्या वतीने सातारा येथे "छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस" हे वसतिगृह सुरू केले. प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे "सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज"सुरू केले.  

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी "कमवा व शिका" ही योजना सुरू केली. त्यांच्या मते शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो.

शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात, तर त्याने डोक्यातले विचार वाढविले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

समतेच्या तत्त्वांचा त्यांच्या संस्थेमार्फत व व्याख्यानामार्फत प्रसार केला. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व बहुजन समाजाचा सर्वागीण विकास हीच उद्दिष्टय़े भाऊरावांनी डोळ्यासमोर ठेवली होती. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वातंत्र्यलढयात सुद्धा भाग घेतला होता. त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी भूमिगत पुढा-यांना बरीच मदत केली. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांना ‘कर्मवीर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

भारत सरकारने "पद्मभूषण" हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९मध्ये "डॉक्टर ऑफ लिटरेचर" ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सत्कार केला. भाऊराव पाटील यांचे निधन ९ मे १९५९ रोजी झाले.थोर शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा हा वेल गगनाला भिडलेला असून या माहात्म्यास मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्रिवार वंदन करतो जय कर्मवीर...

रयत शिक्षण संस्थेचा एक माजी विद्यार्थी

 लेखन -श्री.दिलीपराव डहाळे.  (उपशिक्षक) श्री ग र औताडे  पाटीलमाध्यमिक विद्यालय  पोहेगाव.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News