थोडंसं मनातलं..... "मराठ्यांचे आरक्षण- एक चिघळत पडलेला प्रश्न" ॲड शिवाजी कराळे


थोडंसं मनातलं.....  "मराठ्यांचे आरक्षण- एक चिघळत पडलेला प्रश्न"  ॲड शिवाजी कराळे

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. मुघल साम्राज्याकडून कायमच गोरगरीब व वंचित जनतेवर आणि अबला महिला यांचेवर अन्याय व अत्याचार होत होते. तेव्हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना अठरा पगड जाती जमाती यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मोलाची मदत केली आहे. त्यानंतर पेशवाई आली आणि नंतर जवळपास दिडशे वर्षे इंग्रजी लोकांनी या भारतावर निर्विवाद राज्य केले. भारतातील अनेक नेते आणि  क्रांतिकारकांना स्वतः च्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आणि आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार केले आणि आपण अठरा पगड जाती जमाती चे लोक लोकशाही राज्यात जगायला लागलो. खरे तर तेव्हा सगळेच लोक उच्च वर्णीय नव्हते. अनेक जण गोरगरीब व वंचित लोकांच्या घरातील चूल ही पेटत नव्हती.त्यामुळे शिक्षण घेणे हा तर प्रश्नच नव्हता. म्हणून अशा गोष्टींचा सकारात्मक विचार केला आणि अर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांना समाजात मानाचे स्थान मिळावे, शिक्षण, नोकरी मिळावी याच उद्देशाने त्यांना आरक्षण देण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत केली तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात गोरगरीब व वंचित लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा काढल्या. तसेच आदरणीय  फातिमा बीबी यांनी महिला शिक्षिका म्हणून काम केले. पहिल्या महिला डाॅक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे कार्य सुद्धा महान आहे. पुढे चालून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि गोरगरीब मुलांना शिक्षण मिळायला लागले. परंतु पुढे चालून या आरक्षणाचा तोटा अनेक हुशार विद्यार्थी यांना बसायला लागला.अगदी चांगले मार्क असुन सुद्धा  उच्च शिक्षण घेण्यासाठी असलेली भरमसाठ फीस भरणे अशक्य असल्याने हुशार विद्यार्थी त्या पासून वंचित राहू लागले. तसेच मेरीट मध्ये येऊन सुद्धा कमी मेरीट असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळायला लागली. त्यामुळेच समाजातील अनेक घटकांना आरक्षण दिले गेले. वास्तविक खुल्या गटात मोडणा-या मराठा समाजाला सुद्धा शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे तरच मराठा समाजातील काही गोरगरीब व वंचित लोकांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळेल आणि ती कुटुंब सुद्धा सुधारीत होतील अशी अपेक्षा आहे. त्या साठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लाखोच्या संख्येत मराठा क्रांती मोर्चा निघाले होते. तसेच उच्च न्यायालयात सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात पिटीशन दाखल करण्यात आले आहेत. मराठा समाजाने मुक मोर्चा काढला होता. परंतु नाॅटी खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामना या वृत्तपत्रात "मुका मोर्चा" एक कार्टून छापून अपमान केला होता. तसेच मराठा क्रांती मोर्चा चे विरोधात अनेक समाजांनी एकत्र येऊन "प्रतिमोर्चा" काढला होता. वास्तविक मराठा समाजाने कोणत्याही जातीचे आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण मागितले नव्हते आणि नाही .परंतु शेवटी यामध्ये सुद्धा राजकीय नेते मंडळी यांनी बिब्बा घालून वातावरण चिघळत ठेवले. सरकारने सुद्धा मराठा समाजाला कायमच झुलवत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात सुद्धा स्वराज्याशी गद्दारी करणारे सुर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे, अनाजी पंत होतेच. तसेच यावेळी सुद्धा काही ठराविक लोकांनी सरकार बरोबर संधान बांधले आणि आपली पोळी भाजून घेतली. एक मात्र निश्चितच आहेकी मराठ्यांना फक आणि फक्त मराठाच शह देऊ शकतो. मराठा आरक्षण संदर्भात अनेक समित्या नेमल्या,अहवाल मागितले, सर्व शासकीय नियमांची पडताळणी केली आणि मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची घोषणा झाली. त्यानंतर अनेकांच्या पोटात दुखायला लागले होते म्हणून काही मराठाद्वेष्ठ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या. परंतु उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी मराठ्यांना दिलेले आरक्षण कायम ठेवले . त्यावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, तिथे मात्र आरक्षणाला स्थगिती दिली गेली. आता यावरूनच राजकारण पेटलय. काही लोक राज्य सरकारला दोष देतात तर काही जण केंद्र सरकारला दोष देत आहेत. वास्तविक पहाता मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका नाही हे यावरून स्पष्ट होतय. केवळ मतासाठी मराठा समाजाला वापरले जातेय. सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये मराठा समाजाला किती महत्वाचे स्थान आहे हे सर्व समाज जाणतोच आहे. केवळ आणि केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकावे म्हणून काही मराठा राजकीय नेते मंडळी ठोस निर्णय व भूमिका घेत नाहीत. वास्तविक पाहता जर मराठा आरक्षण समिती ने अगदी सुरवातीलाच सांगितले होते की, सदर याचिका पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाचे पुढे चौकशी कामी घ्यावी तर तेव्हा सरकारने का ऐकले नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लाखोच्या संख्येत मोर्चा निघाले व काही बांधवांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले ही जाणीव मराठा समाजातील राजकीय नेते मंडळीना का नसु नये ? मराठा समाजाने कधीच कोणत्याही जातीचे आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण मागितले नाही त्यामुळे त्यांनी प्रतिमोर्चे का काढले? महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना एकत्र येऊन आरक्षण मिळावे म्हणून लढत आहेत.परंतु सरकार मधील नेते मंडळी यांनी मराठा समाजातील काही लोकांना हाताशी धरून आपसात फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. काही स्वार्थी लोक बळी पडले तर काही आपल्या समाजा बरोबर ठाम राहिले. परंतु मराठा समाजातील सर्वच लोकांनी आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तशातच आता महाराष्ट्र सरकारने पोलिस भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण नसल्याने या मध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळेल की नाही हे सांगता येत नाही.या पोलिस भरतीला मराठा समाजातील नेते मंडळीनी विरोध दर्शवला आहे.आता काही मराठा समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे त्यामुळे त्यांना फीस मध्ये सवलती मिळतात की नाही हे सांगता येत. ज्या समाजाला आरक्षण आहे त्यातील किती तरी उमेदवार खुल्या गटातून प्रवेश घेतात आणि खुल्या गटातील जागा कमी करतात. आरक्षण असलेल्या  कित्येक उमेदवारांना अगदी 60% मार्क असले तरी उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो पण खुल्या गटातील उमेदवारांना अगदी 95% मार्क असले तरी प्रवेश मिळत नाही. सरकारने अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जाती जमाती यांना मोफत शिक्षण दिले किंवा नोकरी दिली तरी मराठा समाजाला काही हरकत नाही. तसेच अर्थिक दृष्टीने मागासलेल्या लोकांना  त्यांचे अर्थिक,  शैक्षणिक आणि राजकीय प्रगतीसाठी सरकारने चांगल्या उपाययोजना निश्चितच कराव्यात, त्याला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापल्या लोकांची सोय करावीच लागते हे पण सत्य आहे ना. मराठा समाजातील सर्वच लोक धनदाडंगे नाहीत. आजही ब-याच लोकांना व्यवस्थित घरदार नाही, रोज मजुरी केल्याशिवाय अनेकांची चुल सुद्धा पेटत नाही. त्यांचे साठी आरक्षण असायलाच पाहिजे. आणि सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर मराठा समाजातील सर्वच आमदार, खासदार मंत्री यांनी राजीनामे द्यावेत आणि जसे मराठा क्रांती मोर्चाचे वेळेस जसे एकत्र आले तसेच फक्त समाजा साठी काम करावे. आता अनेक जण वेगवेगळ्या पध्दतीने गळे काढत आहेत. परंतु यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. मराठा समाजातील लोकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ स्थापन केले परंतु त्याला सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. तसेच सारथी संस्था सुद्धा बंद केली. त्यामुळे मराठा समाजाला अर्थिक मदत सुद्धा उपलब्ध होत नाही. आता अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी मराठा समाजातील लोकात फुट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.परंतु लोकांना एक नम्र विनंती आहे की, कृपया आपल्यात दुफळी निर्माण होता कामा नये. मराठा समाजासाठी जे लोकं, संघटना, नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तन मन धनाने आणि स्वंयस्फुर्तीने काम करतात त्यांना पुर्णपणे सहकार्य करणे हे मराठा समाजातील प्रत्येकाचे काम आहे. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. आता फक्त सरकारने सदरचे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाचे पुढे चौकशी कामी घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. जर खरोखरच असे घडले नाही तर पुन्हा मराठा क्रांती मोर्चा निघणार आणि त्या मुळे निश्चितच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर मराठा समाजातील अर्थिक दुर्बल घटकाला शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देता येत नसेल तर सर्वच आरक्षण रद्द करण्यात आले पाहिजे म्हणजे कमी कमी देशात असणारे  सर्वच अठरा पगड जाती जमाती मधील हुशार आणि मेरीट मधील उमेदवारांना शैक्षणिक व नोकरी संदर्भात फायदा होईल. परंतु आता वेळ नक्कीच आणिबाणीची आली आहे, मराठ्यांनी आता तरी आपसातील सर्व मतभेद सोडून समाजासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे.सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाचा  प्रश्न चाळत ठेऊ नये व मराठा समाजाची सहनशीलता पाहू नये. विशेषतः अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आदरणीय खासदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले महाराज आणि आदरणीय खासदार श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी या बाबतीत स्वतः लक्ष घालायला हवे व समाजाचे नेते मंडळी एकत्र कसे येतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे आणि तो म्हणजे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या ज्या मराठा संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था, लोकप्रतिनिधी यांनी पहिल्यापासूनच प्रयत्न केले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि मानाचा मुजरा. तसेच ज्या ज्या समाजातील सन्माननीय व्यक्तीनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे पाठिंबा दिला त्यांचेही मनापासून आभार.मराठा समाजातील तरूण मित्रांनो फक्त विनंती एकच आहे की, कृपया कोणीही कायदा हातात घेऊ नये व विनाकारण गुन्हे दाखल होतील असे काहीही करू नये ही विनंती. कारण काही विघ्नसंतोषी राजकीय पक्षांचे नेते मंडळी मराठा समाजातील लोकात फुट पाडण्याची आणि विनाकारण केसेस दाखल करण्यासाठी तयारच आहेत. एक मराठा लाख मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

मा अध्यक्ष वकील संघ अहमदनगर 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News