मराठी पत्रकार परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने


मराठी पत्रकार परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून, कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना पन्नास लाख रूपयांची मदत देण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत मिळण्याच्या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तोंडाला काळे मास्क लाऊन निदर्शने करण्यात आली. तसेच सदर मागण्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व विरोधी पक्षनेते यांना एसएमएस पाठवण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रोहित वाळके, अन्सार सय्यद, महेश देशपांडे, संदीप कुलकर्णी, शब्बीर सय्यद, संजय सावंत, अमीर सय्यद, शुभम पाचारणे, निलेश आगरकर, आफताब शेख, बाबा ढाकणे, वाजिद शेख, उदय जोशी, प्रसाद शिंदे, आदि पत्रकार वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं आहे. माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलेलं नाही. 500 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. 50 च्या जवळपास पत्रकारांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत आणि कोरोनानं 25 पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील  एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना यौध्दे असून, कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं 25 पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही. पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत  पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. या गोष्टीलाही 15 दिवस झाले पण विम्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. त्यानुसार पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीचे काय झाले? ते समजले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.सरकारने घोषणा केल्या प्रमाणे राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत द्यावी, पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, माथेरानचे संतोष पवार किंवा पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे. पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश तातडीने काढण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्र.निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News