फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने वारकरी संप्रदायातील महाराजांचा नेत्रदानाचा संकल्प


फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने वारकरी संप्रदायातील महाराजांचा नेत्रदानाचा संकल्प

नागरदेवळे येथे ज्येष्ठ नागरिकांसह वारकरी संप्रदायातील महाराजांची नेत्र तपासणी

ह.भ.प. महाराजांनी अवयवदान चळवळीबाबत समाजात जागृती करावी -जालिंदर बोरुडे

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत -) फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात सहभागी झालेल्या वारकरी संप्रदायातील 47 महाराजांनी नेत्रदानाचा संकल्प केला असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्ससह इतर नियमांचे पालन करुन 113 ज्येष्ठ नागरिकांसह नगर तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराजांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील 56 गरजूंवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात इतर रुग्णांवर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना इतर वैद्यकिय सुविधा उपलब्ध होण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. टाळेबंदीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. ही जाणीव लक्षात ठेऊन विविध आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवाने इतरांना जीवदान मिळणार आहे. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून 7 व्यक्तींना जीवदान मिळू शकतो. अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, वारकरी संप्रदायातील ह.भ.प. महाराजांनी अवयवदान चळवळीबाबत समाजात जागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

ह.भ.प. शेंडे महाराज यांनी फिनिक्स फाऊंडेशनचे सुरु असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, या शिबीराद्वारे गोरगरीबांची सेवा घडत आहे. भारतात अवयवदान चळवळीला चालना देण्याची गरज असून, फिनिक्सने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडले असून, अंधांना नवदृष्टी मिळाली आहे. छोट्याश्या गावातून सुरु झालेली ही रुग्णसेवेचा वटवृक्ष बहरला असून, सर्वसामान्यांना याचा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात नेत्रतपासणी बरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे मधुमेह व रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, डॉ. राहुल बोडखे, मिश्रीलाल पटवा, सौरभ बोरुडे, बाबासाहेब धिवर आदिंसह फिनिक्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News