थोडंसं मनातलं.... राणीने डाव जिंकला काय?


थोडंसं मनातलं....  राणीने डाव जिंकला काय?

नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट मात्र प्रथमतःच स्पष्ट करतो की, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही तसेच प्रशासनाचा प्रवक्त्ता पण नाही. या गोष्टी माझ्या मनात निर्माण झाल्या म्हणून मी त्या शब्दात मांडतोय. या मध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता व नाही .

महाराष्ट्रा बरोबरच संपूर्ण देशभर सध्या  एकच विषय वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे समोर येत आहे तो म्हणजे हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री  "कंगना रानावत आणि शिवसेना ". प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण करून देत आहे. हिंदी मराठी चॅनल वर सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात डिबेट होत आहेत. देशातील काही लोक कंगना रानावत या अभिनेत्री ला पांठिबा देतात तर काही जण महाराष्ट्र सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे असे समर्थन करतात. एक मात्र निश्चितच आहेकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दव ठाकरे साहेब यांचे संदर्भात काढलेले एकेरी उदगार आणि मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटतेय असे वापरलेले शब्द याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. 

या अगोदर सुद्धा अभिनेता अमिरखान यांची पत्नी किरण राव ,नसिरूद्दीन शहा यांनी सुध्दा महाराष्ट्र सुरक्षित वाटत नसल्या बाबत विधाने केली होती तेव्हा कुणीच आवाज उठवला नाही हे पण सत्य आहे ना. सुशांत सिंग रजपूत च्या आत्महत्या प्रकरणात कंगनानाने उडी घेतली आणि सगळे खडबडून जागे झाले. त्यातच शिवसेचे प्रवक्त्ते आणि राज्यसभेतील खासदार श्री संजय राऊत साहेब यांनी कंगनानाने महाराष्ट्राचा व छत्रपती चा अपमान केला आहे,तसेच कंगना ही "हरामखोर" आहे असे विधान करून प्रकरण आणखीनच तापवले. महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब यांनी सुध्दा कंगनानाने मुंबई ला येऊ नये असे सांगितले. जर कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड फोडू तसेच तिला शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल असे शिवसेना महिला आघाडीने जाहीर केले. यावर कंगनानाने सुद्धा माघार न घेता " मी 9  सप्टेंबर ला मुंबई ला येतेय, कुणाची हिंमत असेल तर मला आडवा,मुंबई कुणाच्या बापाची नाही " असे विधान करून प्रकरण तापवले. वास्तविक पहाता महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. काल परवा पर्यंत कायम हिंदूत्वाची भूमिका घेणारी शिवसेना यामुळे निश्चितच अडचणीत सापडली आहे आणि त्याचा फायदा भाजपा ने उठवला नाहीतर नवलच वाटले असते. कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आणि कंगना दिमाखात मुंबई ला आली. विमानतळावर शिवसेना महिला आघाडीने निदर्शने केली पण आरपीआय आणि कर्णीसेना यांनी कंगनाला संरक्षण पुरविले. वास्तविक पहाता राज्यात या कंगना पेक्षा ही महत्वाचे प्रश्न आहेत त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, कोरोना सारखा जीवघेणा आजार संपुर्ण महाराष्ट्रात थैमान घालतोय आणि त्याची झळ सर्व सामान्य जनतेला बसली आहे. अनेक शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे, तसेच बिबियाणे विक्री करणारे शेतकरी वर्गाला दिवसेंदिवस फसवित आहेत इत्यादी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असताना कंगना प्रकरणात सरकार मधील फक्त  शिवसेनेनेच एवढे लक्ष का घातले हे न समजण्या इतकी जनता दूधखुळी नाही. शिवसेना आणि भाजप यांच्या मधील राजकीय दरी वाढतच चालली आहे. कंगना रानावत मुंबई मध्ये येई पर्यंत तिचे ऑफिस मुंबई महापालिकेने उखडून टाकले. वास्तविक पाहता हि कारवाईच बेकायदेशीर असल्याने मुंबई उच्च न्यायालयात मनाई हुकूम मिळाला आहे. आता प्रश्न पडतो की, काय मुंबई मध्ये फक्त कंगना रानावत चे ऑफिसच बेकायदेशीर आहे काय? आणि जर बेकायदेशीर असेल तर मुंबई महापालिकेने "स्टाॅप दि वर्क" अशी नोटीस का पाठविली? जिथे कामच सुरू झाले नाही तिथे काम थांबवा अशी नोटीस का पाठविली? तसेच कंगना मुंबईत नसताना तिची नोटीस घरावर चिकटवण्याचे आदेश देणे सुद्धा बेकायदेशीरच आहे, तसेच तिच्या घरात तिच्या परवानगी शिवाय जबरदस्तीने घुसुन तोडफोड करणे ही सुद्धा फौजदारी गुन्हा होईल. सध्या मुंबई महापालिका ही शिवसेनेचे ताब्यात आहे त्यामुळे सुडबुद्धीने कारवाई झाली हे पण सत्य आहे ना. महापालिका प्रशासन यांना जर कोणत्याही अनधिकृत बांधकामाचे बाबतीत तक्रार आली असेल तर रीतसर पंधरा दिवसात म्हणणे मांडण्यासाठी मुदत द्यायला हवी हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परंतु ईथे तर खुपच घाईने कारवाई झाली असल्याने ती मुद्दाम केली आहे हे स्पष्ट होते.  मुंबई मध्ये अनेक धनदाडंगे आणि राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांचे जवळपास एक लाखाचे पेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम आहेत, ते अनधिकृत बांधकाम पाडण्याची हिम्मत महापालिका प्रशासनाने का दाखवली नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. असे अनेक अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिका कडे माणसं नाहीत असेही महापालिकाने कोर्टात सांगितले आहे. परंतु काल परवा पर्यंत कायम काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट करणारी शिवसेना आता मात्र हातबल झाली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. कंगनानाने तिच्या कोणत्याही ट्विट मध्ये महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अपशब्द काढले नाहीत. तिने फक्त संजय राऊत यांनाच टार्गेट केले आहे आणि संजय राऊत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच नाही. संजय राऊत यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार  उदयनराजे भोसले यांना त्यांचे  पुर्वजांच्या पुराव्याची मागणी केली होती तसेच मराठा आरक्षण मिळावे म्हणून लाखोच्या संख्येत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा संदर्भात त्यांचे सामना या वृत्तपत्रात " मुका मोर्चा" म्हणून कार्टून छापून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला होता. या गोष्टीकडे मराठा समाज का दुर्लक्ष करतोय हे सुद्धा समजत नाही. तसेच आता मराठा समाजाला मिळणारे आरक्षणाला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे. या मध्ये सुद्धा सरकारने योग्य भूमिका घेतली असती तर निश्चितच आरक्षण टिकले असते. परंतु आता आदरणीय मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना विचारले शिवाय कोणताही ठोस निर्णय घेणे खरंच अश्यक्य झाले आहे काय हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने कंगना रानावत च्या ऑफिसवर केलेली कारवाईची वेळ चुकली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय खासदार  श्री शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरूपम यांनी म्हटले आहे. सोशल डिस्टन्स चा फज्जा पाडत शिवसेना महिला आघाडीने विमानतळावर अंदोलने केली त्यावर महापालिका अथवा मुंबई पोलिस काय कारवाई करणार? मुंबई पोलिस यांचे कार्यपध्दतीवर संशय निर्माण करणे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन कोणी ही करणार नाही पण निवडणुकांच्या प्रचारात तर आदरणीय मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब यांनी तर मुंबई पोलिस प्रशासन यांचेवर, " भाजपाची धुणीभांडी करा" अशी टिका टिप्पणी केली होती. जर खरोखरच सुशांत सिंग रजपूत हे आत्महत्या प्रकरण असेल तर मुंबई पोलीसांनी केलेल्या तपासावर का शंका घेतली आहे, आणि आता ड्रग्ज माफिया आणि चित्रपट क्षेत्रातील काही दिग्गज लोकांना उघडे पाडण्याची हिम्मत कंगनानाने दाखवली तर तिला संपवून टाकण्याची भाषा का वापरली जाते? एक गोष्ट निश्चितच खरी आहे की, चित्रपट क्षेत्रातील काही मंडळी हे नवीन कलाकार मंडळीना त्रास देतातच. त्यामुळेच गोविंदा, विवेक ओबेरॉय यांना कामं सुद्धा मिळणे कठीण झाले होते. अनेक नट नट्या आणि निर्माते हे आम्ली पदार्थांच्या आहारी गेले आहेत हे सुद्धा खरे आहे. आणि अशाच काहीशा प्रकारातुन सुशांत सिंग रजपूत चा खून झाला आहे असे मत कंगना रानावत हिने व्यक्त केले आहे. त्यामुळे एनसीबी आणि सीबीआय ची कारवाई सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे सगळ्यांना झटका बसला आहे. त्यातच रिया चक्रवर्ती आणि इतर गॅगचे सगळे धागेदोरे एनसीबी ला सापडले आहेत.त्यामुळे निश्चितच खरे प्रकरण जनते समोर येईल. वास्तविक पहाता कंगनानाने कधीच शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार यावर निशाणा साधला नव्हता. पण नाॅटी खासदार संजय राऊत साहेब यांनी "आ बैल मुझे मार" असे केले आणि तिथुन पुढे हे सगळं घडलं. निश्चितपणे देशभर कंगनाला सहानुभूती मिळाली आहे.   आता कंगनानाने मुंबई महापालिका विरूद्ध कोर्टात प्रकरण दाखल केले आहे आणि मे कोर्टाने महापालिका प्रशासन च्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई महापालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. परंतु आता कंगनानाने जर महापालिका प्रशासन यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल केला तर निश्चितच तो गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच कंगना चे घरातील फर्नीचर, पेंटींग आणि इतर सामानाची  केलेली तोडफोड ही बेकायदेशीर असुन त्याची नुकसान भरपाई सुद्धा कंगना मागु शकते. खासदार संजय राऊत यांनी "हरामखोर" म्हणजे "नाॅटी" असा अर्थ सांगितला आहे. आम्ही मात्र इंग्रजी भाषेत नाॅटी म्हणजे खोडकर किंवा खट्याळ असा अर्थ होतो असे वाचले आहे. तसेच आमदार अबु आझमी यांनी सुध्दा "बेशरम" म्हणून कंगनाचा उल्लेख केला आहे त्याबद्दल मुंबई पोलीसांनी कुठेही गुन्हा दाखल केला नाही. शेवटी "ज्याचे हाती ससा तो पारधी" अशी एक जुनी म्हण होती ती आठवली. सत्तेचा माज अनेकदा धुंदी उतरवत असतोच हे सुद्धा नाकारता येणार नाही. चारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज म्हणतात की, "हे ही दिवस जातील". परंतु या सगळ्या प्रकरणात नाॅटी खासदार संजय राऊत साहेब यांनी शिवसेना तोंडावर पाडली आहे असे वाटते आहे. या सगळ्या प्रकारात आता राज्यपाल यांनी मुंबई महापालिका प्रशासन यांनी केलेल्या कारवाई चा अहवाल मागितला आहे तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी कंगना रानावत हिने केली आहे. एक मात्र निश्चितच आहेकी सत्ता मिळविणे सोपे आहे पण ती सत्ता टिकवणे अवघड आहे. आता मात्र मुंबई च्या महापौर यांचेवर अविश्वास ठराव आणण्याची हालचाल सुरू केली आहे. सुशांत सिंग रजपूत चे प्रकरण कुठले कुठे गेले हे या सगळ्या गोष्टी पहाता लक्षात येईल. खरं सांगायचं तर वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला नसता हे शिवसैनिक सुध्दा खाजगीत मान्यच करतात. कंगनानाने सुद्धा आपल्या जिभेवर ताबा ठेवण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा "तू"  म्हणून उल्लेख करणे हे चुकीचे आहे. सध्या तरी शिवसेना आणि कंगना रानावत हा विषय संपला असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. आता विषय सुरू आहे तो कंगना रानावत आणि मुंबई महापालिका यांचा. थोडक्यात सांगायचे तर "राणीने डाव जिंकला काय? असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही ना. आता तर कंगना ला केंद्र सरकारने आणि हिमाचल सरकारने सुद्धा सुरक्षा दिली आहे. महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक भारत च्या पत्रकारांना अटक केली आहे. आता या सगळ्या बाबी मे न्यायालयात गेलेल्या आहेत. कंगना च्या कारवाई बाबतीत सरकार मधील सहकारी पक्ष नाराज झाले आहेत त्यामुळे आता शिवसेनेला फक्त सरकार टिकवण्यासाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे. या सरकार कडून सर्व सामान्य जनतेला खुप अपेक्षा आहेत. लाॅकडाऊन च्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. लोकांना अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत  तसेच कोविड-19 ने खुपच मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे तसेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे परंतु अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सध्या तरी कंगना रानावत प्रकरणात लक्ष न घालता जनतेचे प्रश्न मार्गी कसे लागतील यात लक्ष घालायला हवे  वाटते आहे. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News