अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : येथील अमरधाम मध्ये होणाऱ्या दशक्रिया विधी सोमवार दि .१४ पासून ते मंगळवार २९ सप्टेंबरपर्यंत पुरोहीत मंडळाकडून बंद करण्यात आले आहेत. अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष श्री.किशोर जोशी यांनी दिली आहे. अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. यात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पॉझीटीव असल्याची माहिती लपवत आहेत. तर काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे असे सांगतात, परंतू प्रत्यक्षात ५० ते ७० लोक असतात. अनावश्यक गर्दी केली जाते. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो. सध्या दररोज कोरोनाचे जिल्ह्यात ७५० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. अंदाजे रोज १८ ते २० लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने दि .१४ ते २९ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धार्मिक विधी अमरधाम मध्ये केले जाणार नाही, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे, असे किशोर जोशी यांनी सांगितले