शहरातील वीज पुरवठा खंडित प्रश्‍नी आमदारांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर


शहरातील वीज पुरवठा खंडित प्रश्‍नी आमदारांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर

तातडीने उपाययोजना करण्याचे राष्ट्रवादीचे निवेदन अन्यथा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरासह उपनगरात वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी शहर व उपनगरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता शहर एच.एल. भराडे व एम.एस. देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गजेंद्र भांडवलकर, वैभव ढाकणे, ऋषीकेश ताठे, दिपक खेडकर, सुमित कुलकर्णी, दादा दरेकर, अमोल कांडेकर आदि उपस्थित होते. 

शहरात व उपनगरात अवेळी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विजेशी निगडित उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांचे सद्यस्थितीत ऑनलाईन क्लासेस सुरू असून, यावेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे. घरात लाईट नसल्याने महिला वर्ग देखील संतप्त असून, सायंकाळच्या वेळी किंवा दिवसभरात केव्हाही छोट्या-मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास अहमदनगर शहरात तासन तास वीज पुरवठा खंडित होतो. तसेच याबाबत आपल्या विभागीय कार्यालयाकडे नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्या ठिकाणचे फोन उचलले जात नाही किंवा व्यस्त असतात. वीज वितरण मंडळाच्या उदासीन कारभारामुळे व्यावसायिक, महिला, विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे अगोदरच सर्व व्यवसाय व उद्योगधंदे अडचणीत आले असताना, महावितरणच्या गलथान कारभारामुळे त्यात भर पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडून सुधारणा न झाल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन करुन जबाबदार अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News