मनपामध्ये कॉंग्रेसची सत्ता येण्यासाठी पक्ष श्रेष्ठींचे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन हवे.....सुंदर कांबळे


मनपामध्ये कॉंग्रेसची सत्ता येण्यासाठी पक्ष श्रेष्ठींचे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन हवे.....सुंदर कांबळे

विठ्ठल होले पुणे

पिंपरी (दि. 7 सप्टेंबर 2020) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. आता पासूनच पक्ष संघटना बांधणीसाठी शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी, वरिष्ठांनी सुरुवात करावी. त्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्ष श्रेष्ठींनी शहरात येऊन कार्यक्रम, बैठका घेऊन शहर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी आर्जव महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केली आहे.

      रविवारी (दि. 6 सप्टेंबर) असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या पिंपरीतील कार्यालयात सुंदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शहरात येऊन बैठका, कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावी. त्यासाठी शहरातून बाळासाहेब थोरात यांना पाच हजार विनंती पत्र पाठविण्यात यावीत असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. या बैठकीत असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शीतल कोतवाल, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष संजय साळवी, ड्रायव्हर संघटना शहराध्यक्ष नवनाथ डेंगळे तसेच नितीन पटेकर, संजय कसबे, विजय शिंदे, मोहन उनवणे, सुरेश येवले, निलेश ओव्हाळ, लहू उकरंडे, नसीमा मोमीन, राजश्री वेताळे, सलमान शेख, मूनीरा शेख, महिरा शेख, स्वाती खैरे, संगिता बाबर, जयश्री साळुंखे, नाजूका भवार, लीला क्षिरसागर, सूमय्या मनियार, मल्लिका शेख आदी होते. तसेच परवीन शेख, संगीता वावरे, मालन गायकवाड यांनी असंघटीत कामगार कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

         यावेळी सुंदर कांबळे म्हणाले की, दिवंगत खासदार आण्णासाहेब मगर यांनी नगरपालिकेची स्थापना केली. दिवंगत माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी या शहरात एकहाथी कॉंग्रेसची सत्ता स्थापन केली होती. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रा. मोरे यांनी दूरदृष्टीने नियोजन केले. यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालायाची स्थापना केली. शहरात नामांकित शैक्षणिक संस्थाचे जाळे वाढविले. शहराच्या औद्योगिकीकरणासाठी स्वता: पुढाकार घेतला. प्रा. मोरे सरांच्या आकस्मित निधनानंतर पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पोरकी झाली. तेंव्हापासून अद्यापपर्यंत शहर कॉंग्रेसची कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी मनापासून जबाबदारी घेतली नाही. मागील विधानसभा निवडणूका होऊन बरेच महिने झाले. महाविकास आघाडी सरकार मध्ये कॉंग्रेसने सहभाग घेतला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी शहराला एकदाही भेट दिली नाही वा एकही जाहिर कार्यक्रम केलेला नाही. त्यांनी शहरात यावे अशी विनंती असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने त्यांना वेळोवेळी शिष्ठमंडळासह भेटून आम्ही केली आहे. आता पुढील दहा दिवसात पाच हजार विनंती पत्रे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविणार आहोत. 2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत पक्षश्रेष्ठींनी आमच्या विनंती पत्रांची दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे. गांधी जयंती पर्यंत प्रतिसाद मिळाला नाही तर 21 ऑक्टोबर 2020 पर्यंत शहरातील असंघटीत कामगार कॉंग्रेसचे कार्यकर्ते अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सोनिया गांधी यांना पंचवीस हजार विनंती पत्र पाठवतील अशीही माहिती सुंदर कांबळे यांनी दिली. स्वागत, प्रास्ताविक शितल कोतवाल, सुत्रसंचालन नितीन पटेकर आणि आभार संजय साळवी यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News