थोडंसं मनातलं.... " मोहजाल आणि विस्कळीत झालेली अर्थिक व्यवस्था ".. ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडंसं मनातलं....  " मोहजाल आणि विस्कळीत झालेली अर्थिक व्यवस्था  ".. ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो 

जगात सध्या कोविड-19 जोरदार  थैमान घालतोय आणि त्याची झळ भारत देशाला सुद्धा बसली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाचव्यांदा टप्प्याटप्प्याने 30 सप्टेंबर  2020पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या लाॅकडाऊन च्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. आता ही विस्कळीत झालेली अर्थिक घडी कधी बसेल हे काही नक्की सांगता येत नाही, त्यामुळे अनेक लोकांना उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. काही लोकांचे छोटे छोटे व्यवसाय बंद पडले तर काही कंपन्यानी कामगार कपात केली,  तसेच अनेक लोकांचा रोजगार गेला असल्याने अनेक तरुण आणि तरूणी बेरोजगार झाले आहेत.आता जवळपास कोरोना संपल्या सारखाच आहे, अशा परिस्थितीत जे कामगार कामावरून कमी केले होते त्यांना आता परत कामावर कधी घेतले जाईल हे सांगता येत नाही. तसेच मागील काही दिवसापूर्वी सरकारने ज्या लोकांनी बॅंकेचे घरासाठी, व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहे त्यांचे हप्ते कपात न करण्या बाबतीत सुचना दिल्या होत्या. परंतु आता कर्ज कपातीची सुरूवात होणार आहे, तसेच अनेक लोकांचे मुलांना ॲडमिशन साठी फीस भरावी लागणार आहे त्यामुळे आता तर फार मोठ्या प्रमाणात अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.आता कुठे तरी जनजीवन सुरळीतपणे चालू होईल यात शंकाच नाही.पण ख-या अर्थाने सर्व उद्योग व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन च्या काळात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. अनेकांनी शाॅर्ट कट पैसा कसा मिळेल असे उद्योग केले तर काही मेहनती तरूण तरूणी यांनी याला न डगमगता कोणत्याही प्रकारचे कष्ट करून आपली उपजीविका करत आहेत तर त्यातीलच काही तरूणांनी व तरुणींनी लोकांची फसवणूक करण्याच्या गैरहेतुने वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवली आहे. ज्या लोकांना कंप्युटर, मोबाईल व इतर टेक्निकली नाॅलेज आहे त्यांनी लोकांचे फेसबुक हॅक केले आणि त्याचे माध्यमातून अनेक लोकांना गंडा घातला आहे. तसेच काही तरूण व तरूणी सध्या फेसबुक, व्हाॅटस अप व मेसेंजर च्या माध्यमातून  प्रथमतः तरूणाईला भुरळ घालतात आणि ओळख वाढवून नंतर ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात. अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे सायबर क्राईम सेल कडे दाखल करण्यात आले आहेत. आता तर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात " मित्र मैत्रिणी  बनवा आणि घरबसल्या कमवा " अशा स्वरूपाच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात आणि त्याचे खाली फक्त मोबाईल फोन नंबर दिला जातो. काही  अतीउत्साही तरूण आणि तरूणी व सामान्य वर्ग सुद्धा या फसव्या जाहिरात बाजीला बळी पडतात आणि फोन नंबर वर संपर्क करतात. मग पलिकडून एखाद्या तरूणीचा गोड आवाज येतो व एखाद्या बॅकेचा अकौंटं नंबर दिला जातो आणि काही ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. मग ज्यांनी फोन केलाय ते पैसे जमा करतात आणि नंतर फोन कायमचा बंद होतो. तेव्हा आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येते, पण चूक आपलीच असल्याने कोणाला सांगायची सोय नाही आणि तक्रार करायची हिम्मत नाही. तसेच अनेकदा  ऑनलाईन पध्दतीने काही घरगुती सामान किंवा काही वस्तू मागितली की दुसरेच काही तरी येते आणि  अनेकदा फसवणूक होते. फेसबुक वर ओळखीचे रूपांतरण कधी कधी प्रेमात होते , एकमेकांना नको ते फोटो शेअर केले जातात, अश्लील संभाषण केले जाते आणि नंतर ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जातो व फसवणूक होते. ब-याच वर्षापासून "स्वस्तात सोने " विकण्याचे अमिष दाखवून अनेकदा लुटले जात असल्याच्या घटना घडतच आहेत तरी सुद्धा लोक अशा अमिषाला अजुनही बळी पडतातच. व्हाॅटस अप व फेसबुक च्या माध्यमातून ओळख करून अनेकदा गोड बोलून व पैशाचे अमिष दाखवून महिलांना सुद्धा फसविले जाते तर कधी कधी दागिन्याला पाॅलीस करून देण्याच्या नावाखाली दागिनेच गायब केले जातात . कधी कधी तर  "तुम्हाला खुप मोठी लाॅटरी लागली आहे,  तुम्ही  इतके लाख रूपये जिंकले आहेत,  तुम्हाला पाॅलीसी मिळाली आहे" अशा स्वरूपाचे मेसेज येतात आणि टॅक्स म्हणून काही रक्कम भरण्यासाठी सांगितले जाते व फसवणूक होते. संगणकिय युगात काहीही करून फसवणूक करण्याचा धंदा खुप लोक करताना दिसतात आणि लोकं फसतात. काही लोक मोठ्या लोकांचे, अधिकारी आणि पदाधिकारी यांचे सोबत चे फोटो काढून घेतात आणि नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक करतात. सध्या मेसेंजर वर अनेक तरुणी " घरी एकटं एकटं वाटतय का, मला फोन करा " अशा स्वरूपाचे मेसेज पाठवून लोकांना फसवतात. खर तर फसवणूक करण्याचे अनेक प्रकार अवलंबित केले जातात, पण या लाॅकडाऊन च्या काळात हे प्रमाण जरा जास्तच वाढलेले आहे. एकदा तर माझेच फेसबुक अकौंटं हॅक केले आणि माझ्या मित्रांना मेसेज करून माझ्या नावाने पैशांची मागणी केली तर काल परवा अहमदनगर चे सुपुत्र आणि मच्या चे पोलिस अधीक्षक इंजिनियर प्रतिक ठुबे साहेब यांचे नावाने कोणीतरी बनावट फेसबुक अकौंटं सुरू केले आणि पैशाची मागणी केली. आमचे मित्रांनी सावधानता बाळगत सदर प्रकार उघडकीस आणला होता. एक मात्र निश्चितच आहेकी, सध्या फुकट काहीच मिळत नाही हे माहित असूनही लोकं फसतातच कसे? अनेक वेळा पोलिस वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे पण जनता त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतः ची फसवणूक करून घेतेच. सध्या  बॅंक अधिकारी सुध्दा आपल्या ग्राहकांना सांगतात की, ओटीपी नंबर व बॅंक अकौंटं बद्दल कोणत्याही अनोळखी लोकांना माहिती देऊ नका, तसेच बॅंक कधीच फोन करून माहिती मागत नाही, तरीही लोकं फसतातच. कोणीतरी फोन करतो की, "मी अमुक तमुक बॅंक अधिकारी बोलतोय, तुमचे "एटीएम" बंद होणार आहे, तुम्हाला एटीएम चालु ठेवायचे असेल तर त्वरित नंबर द्या" आणि लोकं मागचा पुढचा विचार न करता सगळी माहिती देतात आणि बॅंक अकौंटं मधील पैसे परस्पर गायब होतात. वास्तविक पाहता जनतेने सावधान राहिले पाहिजे, आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी लोकांना देता कामा नये तसेच फेसबुक आणि व्हाॅटस अप व मेसेंजर आलेल्या खोट्या आणि बनावट मेसेजला  कधीच बळी पडू नये हि विनंती आहे. सध्या अनेकजण लाॅकडाऊन च्या काळात बेरोजगार झालेले आहेत त्यामुळे ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना फसवतात आणि ब्लॅकमेल करतात. सध्या अशा स्वरूपाच्या केसेस सायबर क्राईम सेल कडे मोठ्या प्रमाणात दाखल होतात. सर्व सामान्य लोकांना व तरूण आणि तरूणीनां विनंती आहे की, कृपया कुठल्याही भुलथापाना बळी पडू नये. एखादी व्यक्ती वारंवार त्रास देत असेल तर लगेच तक्रार केली पाहिजे. सध्या कमी श्रमात जास्त प्रमाणात पैसा कमविण्याचे फॅड आलेले आहे, त्या साठी असे काही तरूण तरूणी कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. काही अर्थिक व्यवहार करणा-या संस्था व त्यांचे चालक सुद्धा जास्त व्याज देण्याच्या नावाखाली अमिष दाखवून गोरगरीब लोकांकडून ठेवी गोळा करतात आणि नंतर अर्थिक घोटाळे करून संस्था बंद करून पळून जातात, मग " तेल ही गेले अन् तुप ही गेले, हाती धुपाटणे आले " अशी परिस्थिती निर्माण होते. असेही प्रकार यापूर्वी घडलेले आहेत व घडतच आहेत आणि तशा स्वरूपाचे गुन्हे सुद्धा वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मधे दाखल आहेत.  कोणत्याही गोष्टीची पुर्णपणे शहनिशा केल्या शिवाय आणि सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय अमिषाला बळी पडू नये हि विनंती आहे. सर्व तमाम लोकांनी "मोहजाला पासून सवधानता बाळगावी" हिच अपेक्षा आहे. सध्या कोविड-19 चा प्रसार होऊ नये म्हणून सुरक्षा व दक्षता घेणे आवश्यक आहे. शासकीय सूचना चे काटेकोर पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे हि नम्र विनंती.  घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News