कोरोना महामारीत फिनिक्स फाऊंडेशन गरजू रुग्णांसाठी ठरला आधार


कोरोना महामारीत फिनिक्स फाऊंडेशन गरजू रुग्णांसाठी ठरला आधार

348 ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी, तर आरोग्य शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरला असून, टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने विविध शिबीरे घेण्यात आली. मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल 2680 गरजूंनी लाभ घेतला. तर 348 ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याची माहिती फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी काळात इतर उपचारासाठी नागरिकांना अनेक हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागल्या. तर कोरोनामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना दवाखान्यात घेण्यास देखील घाबरत होते. टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेतले. नागरिकांची विविध आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे 16 शिबीर घेण्यात आले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे इतर आजाराच्या गरजू रुग्णांची परवड होऊ नये यासाठी फिनिक्सने पुढाकार घेतला होता अशी प्रतिक्रिया जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News