संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:
कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची श्रेणीवाढ करून उपजिल्हा रूग्णालय करावे तसेच नव्याने मंजुर असलेले ट्रामा केअर सेंटर सुरू करणे संदर्भातील कार्यवाही शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आलेली असून कोपरगाव येथील उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात यावे,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
कोपरगाव शहराजवळून जाणा-या प्रमुख राज्यमार्ग 12 आणि राज्यमार्ग 8 जात असून या रस्त्यावर असणारे धार्मिक स्थळे श्री साईबाबा तपोभूमी तसेच ऐतिहासिक कचेश्वराचे मंदिर,दैत्यगुरू शुक्राचार्याचे मंदिर,श्री संत जनार्दन स्वामी समाधी मंदिर,ओमगुरूदेव जंगलीदास माउली आश्रम, तसेच जवळच असलेल्या जागतीक किर्तीचे श्री साईबाबा देवस्थान येत असल्याने या रस्त्यावरून मोठया प्रमाणात सतत वर्दळ सुरू असते. पायी पालखी घेवून जाणारे भाविकही हे साईबाबांच्या दर्शनासाठी येतात विविध शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने,औदयोगिक वसाहत असल्यामुळे रहदारीही मोठया प्रमाणात असते, त्यामुळे दुर्देवाने अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने वैदयकिय सेवा मिळावी म्हणून या ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात यावे, तसेच ट्रामा केअर सेंटर ची उभारणी करावी, यासाठी ग्रामीण रूग्णालया शेजारी जागाही उपलब्घ असल्याचे निदर्शनास आणून देउन दिनांक 8 आॅगस्ट 2015 रोजी तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री डाॅ दिपक सावंत यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यासाठी हिवाळी अधिवेशन 2018 मध्ये प्रश्न क्रमांक 133822 अन्वये प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला. त्यानंतर आरोग्य सेवा संचालनालयाच्या आरोग्य संस्थांचा जोड बृहत आराखडयात या मागणीचा समावेश करून घेण्यात आला, तसेच सन 2001 च्या बृहत आराखडयानुसार नव्याने मंजुर ट्रामा केअर युनिट च्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे रूपये 7 कोटी 31 लाख 23 हजार 884 खर्चाचे ढोबळ अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने मागविण्यात आले, त्यामुळे कोपरगाव येथे उपजिल्हा रूग्णालय करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आलेली आहे
सध्या जगासह देशात आणि राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आलेले आहे, मोठया प्रमाणात आरोग्य व्यवस्थेची आवश्यकता आहे, या ठिकाणी आरोग्याच्या सेवा पुरेसा नसल्याने रूग्णांना सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा रूग्णालयात जावे लागते, त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या या कामाला तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी मागणी सौ कोल्हे यांनी ना टोपे यांचेकडे केली आहे.