थोडंसं मनातलं.... "कोविड-19 पेक्षा घाबरूनच जास्त लोकं बळी गेले" .ॲड शिवाजी कराळे


थोडंसं मनातलं....  "कोविड-19 पेक्षा घाबरूनच जास्त लोकं बळी गेले" .ॲड शिवाजी कराळे

गेल्या मार्च महिन्यापासून कोविड-19 ने खुपच मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. त्याची झळ महाराष्ट्रला सुद्धा बसली आहे. कोविड-19 वर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही तरीही अनेक बाधीत रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. कोविड-19 ने मृत्यू झालेल्या लोकांना मृत्यू दाखला मात्र "कोरोना मुळे मृत्यू" असा दिला जात नाही. खरं सांगायचं तर कोविड-19 पेक्षा घाबरूनच जास्त लोकं मेलेत हे पण सत्य आहे. वास्तविक पाहता कोविड-19 ची भीती जवळपास सर्वच लोकांना वाटायला लागली आहे. कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक प्रयत्न केले आहेत पण प्रशासनाचे हलगर्जीपणा मुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोविड-19 ची एवढी दहशत निर्माण झाली आहे की,लोकं सध्या काहीही करायला तयार आहेत. कोरोना होऊ नये म्हणून अनेक जणांनी वेगवेगळ्या स्वरूपात आयुर्वेदिक औषधे तयार केली. तसेच काही जणांनी तर आयुर्वेदिक काढा विकायला सुरूवात केली. लोकांनी सुद्धा सर्व औषधं घरी सुद्धा आणुन ठेवली. एवढेच नव्हे तर काही लोकांनी  कोरोना म्हणजे देवीचा कोप आहे अशी अंधश्रद्धा पसरविल्या आणि गंडे दोरे घालायला सुरुवात केली. एन 95 मास्क ची खरी किंमत तीस रुपये असताना ते मास्क दोनशे ते अडीचशे रूपयाला विकले गेले. संपूर्ण महाराष्ट्रात किती तरी करोड लिटर सॅनिटायझर विकले गेले. त्यातच कोरोना बाधीत झाल्यावर शासकीय व खाजगी  दवाखान्यात  लवकर बेडची व्यवस्था होत नाही ही सुद्धा भीती काही लोकांना वाटायला लागली. त्यामुळे थोडंसं जरी अस्वस्थ वाटायला लागलं की श्रीमंत लोक लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात दाखल होतात आणि मग बील जास्त प्रमाणात आले की लगेच ओरड सुरू करतात. तसेच कोविड-19 ने मृत्यू झालेल्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लागतात व मृतदेह घरी सुद्धा आणता येत नाही म्हणून सुद्धा काही लोक घाबरून गेले आहेत. वास्तविक पाहता जर आयुष्य मंत्रालयाने दिलेल्या सर्व सूचना चे काटेकोर पालन केले तर कोविड-19 चे संक्रमण होत नाही हे माहित असूनही लोकं बेजबाबदार पणे वागतात हेच दुर्दैव आहे. खरं सांगायचं तर खाजगी हाॅस्पिटल मध्ये कोविड-19 च्या पेशंट चे बील कसे आकारले जात आहे हे जवळपास सगळ्यांना माहिती झालेच आहे. गोरगरीब लोकांना अर्थिक दृष्टीने ते परवडणारे नाही. परंतु खरोखरच जनता सध्या कोविड-19 ने खुपच मोठ्या प्रमाणावर हैराण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोविड-19 मुळे  मृत्यू चे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसत आहे, दररोज जवळपास दहा ते बारा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे अमरधाम येथे गर्दी वाढतच जाते. महापालिका प्रशासन यांचे कडून दोन तीन दिवसानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक प्रयत्न केले आहेत पण अजूनही कोरोना पुर्णपणे आटोक्यात येत नाही. तशातच लाॅकडाऊन च्या काळात राजकारण केले जात आहे. वास्तविक कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी गर्दी न करणे साखळी खंडीत करणे आवश्यक आहे, परंतु काही राजकीय नेते मंडळी लगेच धार्मिक स्थळे उघडी करावीत म्हणून अंदोलने करतात. जवळपास सर्व धर्मियांचे घराघरात देव्हारे आहेतच ना, मग उगाच धार्मिक स्थळे उघडी करून लोकांना अडचणीत आणुन कुणाचे पोटं भरायची आहेत हेच समजत नाही. सध्या गोरगरीब जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत तसेच अनलाॅकडाऊन भाग चार मध्ये खुपच मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. असे असतानाच अजून राजकीय नेते मंडळी आगीत तेल ओतत आहेत. एक तर सर्व सामान्य जनतेला कोविड-19 चा त्रास होतोच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय आणि खासदार महोदय व आमदार महोदय यांनी जनता सुरक्षित कशी राहील याची काळजी घ्यावी हि विनंती आहे. सध्या कोविड-19 अमुक अमुक औषोधोपचार केल्याने बरा होतो असे फक्त समजले तरी लोक तेथे गर्दी करतात आणि मग लोकांचे भाबडे पणाचा आणि घाबरलेल्या स्थितीचा फायदा घेऊन काही लोक वाटेल ती किंमत आकारुन लोकांना औषध दिले जातात. खरोखरच सध्याची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. लोक सैरभैर झाले आहेत. तशातच एकाच घरात चार पाच पेशंट पाॅजिटीव्ह सापडतात, त्यामुळे अख्खे कुटुंब ची कुटुंब विस्कळीत झालेली आहेत. कोविड-19 च्या चाचण्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला आहे. एकच पेशंट एकदा निगेटिव्ह तर दुसरीकडे पाॅजिटीव्ह आल्याचीही उदाहरणे घडलेली आहेत. शासकीय यंत्रणा सुद्धा कोलमडली आहे. कधी कधी तर बायको पाॅजिटीव्ह येते तर नवरा निगेटिव्ह येतो. एकाच घरातील काही माणसं पाॅजिटीव्ह तर काही निगेटिव्ह आल्याचीही उदाहरणे घडलेली आहेत. त्यामुळे लोकांनी नेमका विश्वास कुठे ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी कोरोना च्या संसर्गित पणामुळे लोक कमी दगावली आहेत परंतु कोरोना च्या भितीपोटी जास्त लोकं दगावली आहेत. या साठी आता तरी शासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची तितकीच आवश्यकता आहे. प्रत्येक पेशंट ला बेड आणि औषधोपचार मिळाले पाहिजे असे वाटते आहे, तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. लोकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या आफवाना बळी पडू नये, जर कोविड-19 चे लक्षण दिसत असतील तर निःसंकोचपणे स्वतः ची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच आता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील अनेक हाॅस्पिटल मधील काही खाटा फक्त कोविड-19 चे पेशंट साठीच आरक्षित केल्या आहेत. तसेच त्याची माहिती नोडल अधिकारी यांचेकडून रोज समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासकीय आदेश पाळूनच घराबाहेर जावे अन्यथा घराबाहेर पडू नये. एक मात्र निश्चितच आहेकी अनेक बेजबाबदार लोकांनी अक्षरशः कायदा धाब्यावर बसवून अवैद्य धंदे केले आहेत तर काही जणांनी मयताच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे. 

मित्रांनो, जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत तसेच प्रशासन सुद्धा सहकार्याची भूमिका घेत आहेत. आपण जर मरणारच असाल तर त्याला जबाबदार सुद्धा आपणच असाल याची जाणीव असू द्या. जर कोणालाही कोरोना संदर्भात काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची मदत घेतली पाहिजे असे वाटते आहे. 

आज तरी कोविड-19 ची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे, कारण ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला या म्हणी प्रमाणेच सध्या अहमदनगर शहरात घडतेय हे मात्र निश्चितच आहे.   त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी हि विनंती आहे, कारण सध्या प्रशासन सुद्धा हातबल झाले आहे. पुरेसे बेड, व्हेन्टीलेटर, औषोधोपचार न मिळाल्यामुळे अनेकदा कोविड-19 चे पेशंट मयत झालेले आहेत. त्यामुळे अमरधाम येथे दररोज धगधगते निखारे पहायला मिळतात. या निमित्ताने फक्त एकच आहे की, कृपया कोणत्याही राजकीय नेते मंडळी यांनी राजकारण न करता जनता सुरक्षित रहावी म्हणून प्रयत्न करावेत हिच अपेक्षा आहे. 

   ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News