दिल्ली येथे शुक्रवारी महाराष्ट्रातील साखर उद्योगातील नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील व आदी नेते.
काकासाहेब मांढरे इंदापूर :(प्रतिनिधी)
केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मदती संदर्भात आठवडाभरात निर्णय होणार आहेत.सध्या अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, अशी माहिती भाजपचे नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.28) दिली.
नवी दिल्ली येथे शुक्रवारी (दि.27) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत झालेल्या बैठकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडून साखर उद्योगाच्या मदती संदर्भात विविध मागण्या करून, सविस्तरपणे चर्चा केली व आपली भूमिका मांडली.तसेच मदती संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकर घेतले जावेत, अशी विनंती केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
गेली दोन-तीन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उस दर व साखरेची विक्री किमत यामधील तफावतीमुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडील कर्जाचे वन टाइम पुनर्गठन करावे, साखरेचा बफर स्टॉक वाढवून द्यावा, कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान द्यावे, सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावे तसेच सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे अनुदानाचे बेल आऊट पॅकेज द्यावे आदी मागण्या या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. सदरच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक असून निर्णय घेणेसाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्रीमहोदयांनी बैठकीत शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साखर उद्योगाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी चांगले निर्णय जाहीर होतील,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
सदरच्या शिष्टमंडळांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील तसेच आ.राहुल कुल, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडीक, पृथ्वीराज देशमुख, कल्याणराव काळे यांचा समावेश होता.
_______________________________