संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यात वाढत असलेली कोरोन बाधित रुग्णांची संख्या चिंता वाढवीणारी आहे. कोरोनाची निर्माण झालेली साखळी तोडून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे मात्र अशा परिस्थितीत नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोन बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. परिस्थिती जरी चिंताजनक असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन योग्य दिशेने काम करीत आहे. कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत ७३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५३३ रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सरासरी ७२.४१% असून दुर्दैवाने १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण १.९० % आहे. कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे त्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून शेवटच्या कोरोना बाधित रुग्णापर्यंत पोहोचवून कोरोना साखळी वाढू नये याची दक्षता आरोग्य प्रशासना कडून घेतली जात आहे त्यामुळे रुग्ण संख्येची आकडेवारी वाढत आहे. हि आकडेवारी जरी मोठी वाटत असली तरी नागरिकांनी घाबरून जावू नये.जून महिन्यापूर्वीची परिस्थिती व आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. जून महिन्यापासून सुरु झालेल्या अनलॉकमुळे लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करता नागरिक एकत्रितपणे वावरत आहेत. मास्कचा वापर न करण्याबरोबरच सुरक्षित अंतर न पाळणे अशा छोट्या छोट्या चुकांमधून कोरोनाचा प्रसार वाढत आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून थोडीशी सजगता दाखविली तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा निश्चितपणे कमी होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व नागरिकांकडून स्वयंशिस्तीचे पालन होणे गरजेचे आहे. नागरिक निर्धास्त झाल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे प्रशासन जरी त्यांची जबाबदारी पार पाडीत असले तरी नागरिकांनी प्रशासनाने स्वयंशिस्तीचे पालन करून आपले कर्तव्य पार पाडावे.कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची काळजी ज्याप्रमाणे प्रशासनाकडून घेतली जात आहे तशीच काळजी नागरिकांनीही घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाची साखळी खंडीत व्हावी यासाठी सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत कोपरगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व नागरिकांनी आपल्या घरीच थांबून प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
– कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र सर्व कोरोनाबाधित रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावे यासाठी प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे. कोरोनाला अटकाव घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे देखील वेळोवेळी सहकार्य व मदत मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी पाहून घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- तहसीलदार योगेश चंद्रे
– कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाला आवश्यक असणारी सर्व मदत आमदार आशुतोष काळे यांच्याकडून वेळेत होत असल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारी औषधे मुबलक प्रमणात उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्ण संख्येत जरी वाढ होत असलीतरी सर्व प्रकारचे आवाहन पेलण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे.
– डॉ. कृष्णा फुलसौंदर (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय)