मनपा व पोलीस अधिकारींनी केली बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीची पहाणी


मनपा व पोलीस अधिकारींनी केली बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीची पहाणी

  • नागरी सुविधा मिळण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
  • कॉलनीस पाणी पुरवठा करण्यास पाणी पुरवठा अधिकारीची सहमती
  • पालथा पाणी हंडा तिरडी आंदोलन स्थगित

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - बोल्हेगाव येथील पोलीस कॉलनीमधील पाणी, रस्ते, गटारी आदि नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना स्थानिक नागरिकांनी भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून गुरुवार दि.27 ऑगस्ट रोजी पालथा पाणी हंडा तिरडी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्‍याची दखल घेत मनपा पाणी पुरवठा अधिकारी इंजि. सातपुते व पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांनी पोलीस कॉलनीस भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर सातपुते यांनी स्थानिक नागरिकांनी घराच्या नोंदी करुन घेतल्यास मनपाच्या वतीने पाणीपुरवठा करण्याची सहमती दर्शवल्याने गुरुवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. बोल्हेगाव येथील पोलीस कॉलनीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असता, अनेक वर्षापासून इतर नागरी समस्या भेडसावत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पोलीसांचे कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी पाणी पिण्यास नसल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. मोहन बोरसे व हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पंधरकर यांनी सदर बाब पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांच्यापुढे मांडली. सोनवणे यांनी सदर प्रश्‍नाची दखल घेत पाणी पुरवठा अधिकारी इंजि. सातपुते यांच्यासह कॉलनीला भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. तसेच या भागातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी बुधवारी पोलीस अधिक्षक कार्यालयात स्थानिक नागरिक व संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी संतोष जाधव, मंदाकिनी कांबळे, दादासाहेब नेटके, अ‍ॅड. गवळी आदि उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी घरांच्या नोंदी करुन घेण्याची सहमती दर्शवली. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस मोठ्या जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र त्यांच्या घरी कुटुंबीयांना पाणी पिण्यासाठी नसणे ही मोठी शोकांतिका असून, सामाजिक बांधिलकी जपत संघटनेने या आंदोलनात पुढाकार घेतला होता. मनपा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पाणी देण्यास तयार झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनपाने बोल्हेगावच्या पोलीस कॉलनीचे इतर प्रश्‍न देखील सोडविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News