अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने नुतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै.वैभव लांडगे, खजिनदार तथा नगर तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे, शहराध्यक्ष पै.नामदेव लंगोटे, पै.विलास चव्हाण, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक किरण मोरे, पारनेर तालुका क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे आदि उपस्थित होते.
जिल्हा तालिम संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याशी कुस्ती खेळ संबंधी चर्चा करुन अहमदनगर जिल्ह्यात असलेला मॅटच्या तुटवड्याचा प्रश्न मांडला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर मैदाने पुर्ववत सुरु झाल्यानंतर कुस्ती मल्लांसाठी तालुकास्तरावर मॅट उपलब्ध करुन देणार आहे. अनेक मल्ल ग्रामीण भागातून येत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरावरच सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुस्तीसह सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भविष्यात कार्य करुन सर्वांना सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.