"थोडसं मनातलं" "ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला " ॲड शिवाजी अण्णा कराळे


"थोडसं मनातलं"  "ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला "  ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो,  आज पासुन सुरु होत असलेल्या श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनापासून हार्दिक शुभेच्छा. कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी  केंद्र सरकारने 31ऑगस्ट पर्यंत पाचव्यांदा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. परंतु आता अनलाॅकडाऊन भाग तीन मध्ये खुपच मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. काल पासून लालपरी एसटी ला परजिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा गोरगरीब जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. फक्त आता खाजगी वाहने  बिगर ई पास शिवाय एका जिल्ह्यातुन दुसरीकडे जाऊ शकत नाहीत अशा अटी शर्ती घातल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सध्या कोविड-19 ने त्रासली आहे. जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरातील काही खासगी हाॅस्पिटलला कोविड-19 चे रूग्णाची व्यवस्था करण्याचे दृष्टीने काही बेड राखीव केले आहेत. तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी एकत्र येऊन अनेक ठिकाणी कोरोना बाधीत रूग्णावर उपचारासाठी कोविड-19 सेंटर सुरू केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक कोविड-19 चे रूग्ण बरे झाले आहेत. असे असतानाच अनेक लोकांची ओरड आहे की, शहरातील हाॅस्पिटल मध्ये गोरगरीब व सामान्य जनतेला बेड उपलब्ध होत नाहीत. परंतु या शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांनी स्पष्ट केले आहे की, जर कोणालाही कोणत्याही कारणासाठी अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी त्यांचे स्वतः चे मोबाईल नंबर वर फोन करावा, मग तरीही अडचणी कशा काय निर्माण होतात. एक तर ज्यांना ज्यांना अडचणी येतात ते आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांना फोन करत नसावेत किंवा परस्पर हाॅस्पिटल मध्ये जाऊन व्यवस्था करत असावेत. अजूनही खरंच काही लोकांना खरोखरच हाॅस्पिटल बाबतीत अडचणी येतात असे वाटल्यास त्यांनी विनासंकोच लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांचे बरोबरच संपर्क करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. 

आज पासुन श्री गणेशोत्सव आणि मोहरम सुरू होत आहेत. पोलिस प्रशासन यांनी मोहरम च्या काळात आजान च्या वेळी मज्जिद वर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच श्री गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात सुद्धा आरतीला लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे या बद्दल प्रशासनाचे आभार. आता राहिला प्रश्न तो म्हणजे खाजगी वाहने एका जिल्ह्यातुन दुसरीकडे बिगर ई पास शिवाय जाऊ शकत नाही याची. परंतु सध्या अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही सिमेवर चेक पोस्ट नाही तसेच कोणत्याही वाहनांना तपासणी करून सोडले जात नाही. शहरात सुद्धा अनेक प्रवाशी लोक दररोज दुस-या जिल्ह्यातून येतातच.त्यांची सुद्धा कुठेही तपासणी केली जात नाही. जर योगायोगाने एखाद्याचे वाहन स्पाॅट वरील पोलिस किंवा महापालिका कर्मचारी यांनी अडविलेच तर तो वाहनचालक त्याचे ओळखीचे अनेक ठिकाणी फोन करतो आणि परिणामी त्याचेवर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. एरव्ही हे सगळं काही ठिक आहे परंतु कोरोना च्या काळात तरी प्रशासनाचे कामात कोणी अडथळा निर्माण करणे चुकीचे आहे. पुर्वी खेडेगावातील एक म्हण होती, " ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, अन् ज्यांना नाही वशिला त्याचा माणूस फाशीला " अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या ई पास एजंट मार्फत मिळवले जातात.  तसेच अनेक शासकीय कार्यालयात सुद्धा ओळखीचे लोकांना प्राधान्य देऊन त्यांचे काम केले जाते परंतु सर्व सामान्य जनतेला अनेकदा चकरा माराव्या लागतात. वास्तविक पहाता शासकीय कार्यालयात नागरिकांनी सांगितलेलं त्याचं काम किती दिवसात  व्हायला पाहिजे असे स्पष्ट पणे शासनाने जाहीर केले आहे.त्या साठी स्वतंत्र कायदाच केला आहे. परंतु तरीही सर्व सामान्य जनतेला त्रास होतोच, आणि शेवटी काही तरी चिरीमिरी दिली तर लगेच काम होते. हे अजून किती दिवस चालणार कुणाला ठाऊक. या चिरीमिरी साठी किती तरी लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. परंतु अजुनही ही परिस्थिती सुधारली नाही. जनतेला शासकीय कार्यालयात चालणारे कामकाज या बाबतीत माहिती मिळावी म्हणून " माहिती अधिकार" हा कायदा पारित केला आहे. तरीही वशिला असल्या शिवाय काम होतच नाही. आता नागरिकांनी सतर्क होऊन कायदेशीर मदत घेतली पाहिजे असे वाटते आहे. त्यामुळे तरी ज्यांची त्याची जबाबदारी कळेल अशी अपेक्षा आहे. परंतु आता करणार तरी काय कुंपणच  शेत खायला लागलं आहे. नागरिकांना जर कोणत्याही कारणासाठी कोणीही काही चिरीमिरी ची मागणी केली तर लगेचच अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली पाहिजे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा आहे. आपण सुरक्षित रहावे म्हणून पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था, पत्रकार मंडळी, डाॅक्टर आणि नर्स आपले जीव धोक्यात घालून सर्व शासकीय अधिकारी काम करतात याची जाणीव नागरिकांनी ठेवावी अशी अपेक्षा आहे. शासकीय आदेश पाळूनच घराबाहेर जावे अन्यथा घराबाहेर पडू नये, तसेच  कोविड-19 बाबतीत काही लक्षणे दिसू लागली की त्वरित डाॅक्टरनां दाखवा आणि तपासणी करून घेतली पाहिजे. घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News