श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२१: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे वैभव सुभाष चौधरी या तरुणाने हातात धारदार सत्तुर घेऊन संपूर्ण गावाला वेठीस धरून दहशत निर्माण केल्याने त्याच्या विरोधात गावातील ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांनी एक होऊन त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी असा ठराव करून ग्रामसभेत ग्रामपंचायतीने श्रीगोंदा पोलिसांना दिला आहे.
दि.१९ रोजी संध्याकाळच्या सुमारास वैभव चौधरी या विक्षिप्त तरुणाने गावातील जेष्ठ नेत्यांसह एका कुटुंबाला संपविणार अशी धमकी देऊन शिविगाळ करत रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवत वाद घालून त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरणात तयार झाले होते. या घटनेचा गावच्या मोठ्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
घटनेच्या दिवशी चौधरी याने दहशत निर्माण केल्यानंतर भितीपोटी येथील संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यानी बंद केली याचे पडसाद बाजारपेठेवर पुन्हा होवून नये म्हणून माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते,जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते,जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, उपसरपंच सुनिल पाचपुते, शहाजी भोसले, भास्कर जगताप, चांगदेव पाचपुते,अशोक दांगट, बाळासाहेब राहिंज, कैलास पाचपुते, लालासाहेब फाळके, यांनी भैरवनाथ चौकात एकत्र जमून दहशत करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कडक कारवाई करावी व ग्रामसभेत केलेला ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांना देण्यात आला.