थोडसं मनातलं... " स्मशानातील धगधगते निखारे " ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं...  " स्मशानातील धगधगते निखारे "   ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो, सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 थैमान घालतोय आणि त्याची झळ अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा बसली आहे. कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासना बरोबरच अहमदनगर जिल्हा प्रशासनाने सुद्धा खुपच मोठ्या प्रमाणात चांगल्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोविड-19 ब-यापैकी आटोक्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक कोविड-19 चे  पेशंट ने कोरोना वर मात केली आहे तर काही लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे. अहमदनगर मधील काही सुजाण नागरिक आणि वाचकांना एक प्रश्न पडला आहे की, कोविड-19 वर अजुनही कोणत्याही प्रकारचे व्हॅक्सीन अथवा औषध उपलब्ध झाले नाही हे शासना कडूनच स्पटपणे सांगितले जाते, मग कोविड-19 चे पेशंट बरे कोणत्या औषोधोपचाराने होतात? तसेच औषध उपलब्ध नसतानाही खाजगी हाॅस्पिटल मध्ये एवढा मोठा खर्च कसा काय येतो?. वास्तविक पहाता हे प्रश्न खरोखरच बरोबर आहेत, यावर प्रशासनाने व डाॅक्टर मंडळी यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तरच लोकांचे मनातील शंकेचे निरसन होईल. 

पुर्वी कधी तरी महिना पंधरा दिवसांत अमरधाम मधील सरणाची आग धगधगताना दिसत होती, परंतु सध्या दररोजच्या वाढत्या मृत्यू मुळे अमरधाम येथे दररोज जवळपास दहा ते बारा पेशंट वर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे स्मशानातील आग कायमच धगधगताना पहायला मिळते. कधी कुणाचे घरातील कर्ता व्यक्ती मयत झालेला असतो तर कधी नुकताच विवाह बंधनात अडकलेला तरूण मृत्यूच्या दाढेत जातो. खरोखरच किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे याची कल्पना सुद्धा करता येत नाही. आपल्याच  घरातील दररोज सोबत असणा-या माणसाला कुणीच नातेवाईक नसल्या सारखे व कोणत्याही प्रकारचे विधी न पार पाडता लावारीस म्हणून   महापालिका "अंत्यसंस्कार" करते. अंत्यसंस्कार च्या वेळी घरातील कोणत्याही व्यक्तीला मृतदेहाचे जवळपास येउ दिले जात नाही की कुटुंबातील कोणालाही त्याचे अंतीम दर्शन सुद्धा घेता येत नाही. काल 24 तास थांबल्या नंतर मृतदेह नातेवाईकांना मिळाल्या बाबतीत ची  दैनिक नगर टाईम्स मध्ये वाचण्यात आली. खरोखरच मन सुन्न झालं. बर मृत्यू झालेल्या लोकांचा मृत्यूचा दाखला सुद्धा "कोविड-19 ने मृत्यू" झाला आहे असा न देता फक्त "मृत्यू झाला आहे" एवढाच दाखला दिला जातो. वास्तविक कोविड-19 च्या पेशंट चे शवविच्छेदन सुद्धा केले जात नाही. काही काही लोकांना काही अटी शर्तीवर विमा संरक्षण असते त्या साठी तरी शवविच्छेदन अहवाल अवश्यक असतो. परंतु सध्या कोविड-19 चे पेशंट बेवारस असल्या सारखेच त्यांची विल्हेवाट लावली जाते हा खरोखरच मनाला सुन्न करणारा प्रकार आहे. पण काय करणार, शासकीय नियमाचे उल्लंघन तर करता येत नाही ना, त्या मुळे जनता शासकीय नियमाचे उल्लंघन करत नाही. परंतु आता इतर आजाराने मरणारे लोकांचेपेक्षा कोविड-19 ने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच  शासकीय आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये सुद्धा इतर आजाराने ग्रस्त असलेले पेशंट कदाचितच पहायला मिळतात. अमरधाम मधील मृत्यू ची नोंद ठेवण्याचे व मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे महापालिका कर्मचारी श्री सादीक पठाण यांनी सांगितले की, मार्च महिन्यापासून आता पर्यंत जवळपास 300ते 350 मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. खरोखरच श्री सादिक पठाण यांच्या सारख्या "कोरोना योद्ध्याच्या" कार्याला सलाम केलाच पाहिजे. तसं पाहिलं तर कोविड-19 चे मृतदेह शववाहिकेतुन अमरधाम येथे आणणारे ड्रायव्हर आणि त्यांना मदत करणारे कर्मचारी यांना खरे "कोरोना योद्धे" म्हणून संबोधलं पाहिजे. कोविड-19 च्या भिती पोटी कीती तरी नातेवाईक आणि घरातील मंडळी शासकीय परवानगी नसल्याने  मृतदेह घरी सुद्धा आणत नाहीत पण श्री सादीक पठाण सारखे कोरोना योद्धे कोणतीही जातपात आणि धर्म पहात नाही आणि आपले काम प्रामाणिक पणे पार पाडताना दिसतात ही अभिमान वाटणारी गोष्ट आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही, स्मशानातील धगधगते निखारे दररोजच पेटताना दिसतात. खंर तर याच संकटाच्या काळी आपले कोण आणि परके कोण हे सुद्धा समजून येते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः होउन काळजी घेणे आवश्यक आहे, प्रशासन आपल्या सोबत आहेच ना. शासकीय आदेश पाळूनच सर्व काम धंदा आणि व्यवसाय व नोकरी करायची गरज निर्माण झाली आहे. कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे त्यामुळे त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे. स्मशानातील पेटते धगधगते निखारे कमी करायचे असतील तर सर्वांनी शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News